

दैठणा: तालुक्यातील दैठणा परिसरात बिबट्यासदृश प्राण्याने म्हशीच्या वासरावर हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री 2 वाजता घडली. सदरील प्राण्याने वासराला दोरासह ओढत काही अंतरावर नेले. दरम्यान, शेताकडे बांधलेल्या कुत्र्याने मोठ्याने भुंकायला सुरुवात केल्यामुळे शेतमालक विष्णू रोहिदास देशमाने यांना जाग आली. त्यांनी तातडीने बॅटरीच्या उजेडात पाहणी केली असता, एक अज्ञात प्राणी त्यांच्या म्हशीच्या वासराला ओढत नेत असल्याचे दिसले.
अंधारामुळे तो प्राणी नेमका कोणता, हे ओळखता आले नाही. शेतमालकांनी आवाज केल्यामुळे तो प्राणी वासराला सोडून पळून गेला. मात्र तोपर्यंत म्हशीचे वासरू गतप्राण झाले होते. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तत्काळ दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विष्णू देशमाने यांनी ही माहिती लगतच्या शेतकऱ्यांना गुरुवारी 4 वाजता कळवली. यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी परिसरात पाहणी केली असता बिबट्या सदस्य प्राण्याचे ठसे आढळून आले.