पाथरीत माजी आ.बाबाजानींसह चौघांवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीनंतर शिवसेना शिंदे गट व दुर्राणी समर्थक भिडले
पाथरीत माजी आ.बाबाजानींसह चौघांवर गुन्हा दाखल
File Photo
Published on
Updated on

पाथरी : साईबाबा विकास आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.12) शहरातील पालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकी दरम्यान काही वादग्रस्त मुद्दे उपस्थित झाले होते. बैठक संपताच प्रवेशद्वारावर संतप्‍त झालेल्या माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह त्यांचे समर्थक व शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद उद्भवून तो प्रकार हाणामारीपर्यंत पोहचला. दरम्यान शिवसेनेचे अलोक चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह चौघा जणांवर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर सुरू असलेल्या वाद-प्रतिवादाचा भडका यानिमित्‍ताने समोर आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हाधिकारी गावडे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पालिकेच्या सभागृहात साईबाबा विकास आराखड्यासंदर्भात शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विकास आराखड्यावर चर्चा सुरू होती. बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत शहरातील शॉपिंग कॉप्लेक्स व घरकुल घोटाळ्याचा मुद्दा शिवसेनेचे अलोक चौधरी यांनी उपस्थित केला. त्यावरून तेथेच वादाची ठिणगी पडण्यास सुरूवात झाली होती. मात्र बैठकीचा विषय वेगळा असल्याने इतरांनी हस्तक्षेप करून वादाचा विषय थांबविला.

दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही बैठक संपल्यानंतर नागरिकांसह सर्वच पदाधिकारी सभागृहातून खाली प्रवेशद्वारासमोर आले होते. त्याचवेळी अलोक चौधरी हे देखील तेथे आले असताना माजी आ.बाबाजानी व त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामुळे दोन्ही समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी उडून हे प्रकरण धक्‍काबुक्‍की व मारहाणीपर्यंत पोहचल्याने मोठा जमाव एकत्र आला होता. दोन्ही बाजूंनी जोरजोरात ओरडून धमक्या दिल्या जात होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेचे राज्य सचिव आसेफ खान, जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ घांडगे, एकनाथ शिंदे, अमोल भाले पाटील, विक्रम पाटील, शाकेर सिद्दीकी, लक्ष्मण तिडके, शेख खालेद, हसिफ खान आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अलोक चौधरींची फिर्याद

पालिकेच्या प्रवेशद्वारावर झालेल्या राडयानंतर शिवसेनेचे अलोक चौधरी यांनी पोलिस ठाणे गाठून या संदर्भात फिर्याद दिली. बैठकीत शॉपींग कॉप्लेक्स व घरकुल घोटाळयाचा मुद्दा मांडण्याच्या कारणावरूनच माजी आ.बाबाजानी यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली. बाबाजानी यांनी इसको खल्‍लास करो, या शब्दात कार्यकर्त्यांना भडकावले. त्यामुळेच त्यांच्यासमवेत असलेले तबरेज खान दुर्राणी, शहेजाद खान, बक्‍तीयार खान, हमिद खान शेरखान यांनी बाबाजानी यांच्या सांगण्यावरून आपल्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या फिर्यादीवरून माजी आ.बाबाजानींसह या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news