

Case registered against 12 people for kidnapping and brutally beating a student
परभणी, पुढारी वृत्तसेवा : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला शेतात नेऊन अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील धर्मापुरी शिवारात घडली. १५ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपी फरार आहेत.
१६ वर्षीय शाळकरी विद्यार्थी आणि दुसरा एक यांच्यात १२ ऑक्टोबर रोजी बोलाबोलीतून वाद झाला होता. त्यावेळी मारहाणही झाली होती. त्यानंतर तुला पाहून घेतो, अशी धमकी देण्यात आली होती. १५ ऑक्टोबर रोजी रात्री फिर्यादी आणि त्याचा मित्र धर्मापुरी शिवारात असताना काळ्या रंगाची जीप त्याच्याजवळ आली.
या जीपमधून आलेल्या इसमांनी फिर्यादीला जबरदस्तीने जीपमध्ये बसवून नेले. विद्यार्थ्याला एका शेतात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. त्याचे कपडेही काढण्यात आले. त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पुन्हा मारहाण केली. इतक्यावरच न थांबता त्याच्याकडून शेतातील शेण साफ करवून घेतले गेले.
संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केलीस तर जिवे मारू, अशी धमकी देत त्याला दुचाकीवरून घरी आणून सोडण्यात आले. या घटनेनंतर गंभीर अवस्थेत असलेला विद्यार्थी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून, उपचारादरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून भागवत रेंगे, अमोल पुटे, पवन आळसे, सोनू सिंग, यश निर्मळ, हनुमान रेंगे, गणेश चव्हाण, कृष्णा गिरी, अंगद निकुरे, ओंकार रेंगे आणि बालाजी वाघ या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडून चार दिवस उलटूनही आरोपी फरारच असून, पोलिसांचे शोधकार्य सुरू आहे.