जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करून शिवीगाळ केल्या प्रकरणी अज्ञात फेसबुक चालवणाऱ्यावर जिंतूर पोलिसांत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे मागील दीड वर्षांपासून विविध आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनास वाढता पाठिंबा पाहता त्यांना विविध मार्गाने बदनाम करण्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार मागील चार- पाच महिन्यांपासून ओबीसी समाज जिंतूर तालुका या फेसबुक पेजवरून सुरू आहे. बदनामीकारक फोटो व मजकूर प्रसिद्ध करण्यात येत होते. यामध्ये मनोज जरांगे यांना अश्लील शिवीगाळ करणे, फोटो मॉर्फ करून मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम सातत्याने चालू होते. अशा प्रकारामुळे दोन समाजात तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा पर्यंत सुरू आहे.
या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे यांच्या फिर्यादीवरून ओबीसी समाज जिंतूर तालुका या फेसबुक पेज चालवणाऱ्या अज्ञातविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.