

Car rams into Kavad Yatra; Two killed, four seriously injured
पाथरी, पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारच्या दिवशी पाठीमागून आलेल्या भरधाव कार कावड यात्रेत घुसल्याने या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर चार भाविक गंभीर जखमी झाले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.११) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पाथरी-सेलू महामार्गावरील खेडूळा पाटीजवळ घडली.
सदर घटनेतील मृतांमध्ये एकनाथ गंगाधर गजमल (वय ५०, रा.डासाळा) आणि ऋषिकेश सुरेश शिंदे (वय १६, रा.सेलू) यांचा समावेश आहे. या अपघातात प्रभू तेवर, कृष्णा केशव भोसले, धनराज शाम खेडकर, कृष्णा डोळझापे हे चार भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारप्रमाणे सेलू येथील कावड यात्रा ही रत्नेश्वर (रामपुरी) येथे गोदावरी स्नानासाठी गेली होती. गंगास्नान करून पहाटे परतीच्या मार्गावर असलेल्या यात्रेला खेडूळा पाटीजवळ एमएच ०३ सीएच १२११ या भरधाव कारने पाठीमागून येऊन जोराची धडक दिली. या अपघातामुळे पायी चालत असलेले अनेक भाविक खाली पडले.
या कारची धडक एवढी जबरदस्त होती की एकनाथ गजमल आणि ऋषिकेश शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी मयत एकनाथ गजमल यांचे भाऊ भुजंग गजमल यांनी पाथरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक गजानन खंडागळे याच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाथरी ठाण्यातील पोलिस करीत आहेत.