

पूर्णा : येथील नगरपरिषद कार्यालयात स्वच्छता विभागात कामावर असलेल्या ३६ वर्षीय नागसेन केरबा गायकवाड या कर्मचाऱ्याचा मृतदेह त्यांच्या अशोकनगर येथील राहत्या घरी बंद असलेल्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत शनिवारी (दि.८) फेब्रुवारी रोजी सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा शहरातील अशोक नगर भागातील एका घरातून दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांना लक्षात आल्याने त्या प्रकाराची त्यांनी पूर्णा पोलीसांना माहिती दिली. त्यावरुन पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमेश्वर शिंदे, जमादार बंडू राठोडसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी पाहणी केली असता बंद खोलीत पालिका कर्मचारी नागसेन केरबा गायकवाड यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घरात त्या वेळी कोण नसल्याचे आणि घरातील दरवाजाला आतून कुलूप लावले असल्याचे निदर्शनास आले. सदर घटनेचा पुढील तपास पोनि विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करत आहेत.