ZP Election Result : परभणीत राष्ट्रवादीची सत्ता उखडून फेकत भाजप बनला नंबर वन

५४ जागांच्या या अटीतटीच्या लढतीत भाजपने तब्बल २४ जागा जिंकत सर्वाधिक मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे.
Gangapur News
परभणीत राष्ट्रवादीची सत्ता उखडून फेकत भाजप बनला नंबर वनpudhari photo
Published on
Updated on

BJP becomes number one, uprooting NCP's power in Parbhani

सुभाष कच्छवे: परभणी परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठे राजकीय उलटफेर पहायला मिळाले आहेत. ५४ जागांच्या या अटीतटीच्या लढतीत भाजपने तब्बल २४ जागा जिंकत सर्वाधिक मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत, त्यांच्या ताब्यातील सत्ता खेचून आणली आहे. या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, त्यांची सदस्य संख्या २४ वरून १५ वर घसरली आहे.

या विजयात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे १५ गट येतात. त्यापैकी तब्बल ११ गटांत भाजपचा झेंडा फडकला आहे. मागील निवडणुकीत भाजपचे केवळ ५ सदस्य होते, ही संख्या आता २४ वर पोहोचली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आणि मेघना बोर्डीकर यांनी केलेले सूक्ष्म नियोजन आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकासाच्या मुद्द्यावर घेतलेल्या प्रचारसभा यामुळे भाजपला हे यश मिळाले आहे.

जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसलाही गळती लागली असून, त्यांना केवळ परभणी तालुक्यात ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर झालेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ६ जागा मिळाल्या आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५ जागा जिंकत जिल्हा परिषदेत दमदार एन्ट्री केली आहे.

परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने मारलेली मुसंडी आणि सेलू जिंतूरमध्ये मिळालेले यश, यामुळे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन आणि वर्चस्व वाढले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवून त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे.

जिंतूरमध्ये राष्ट्रवादीची मुसंडी

बोरी : जिंतूर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बोरी आणि कौसडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) जोरदार मुसंडी मारली आहे. दोन्ही जिल्हा परिषद गटांसह तीन पंचायत समिती गणांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर भाजपला केवळ कोक गणात विजयावर समाधान मानावे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news