Parbhani News | भोगाव (देवी) येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात
जिंतूर : तालुक्यातील भोगाव (देवी) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आठवीनंतरच्या शिक्षणाची सोय नसल्याने अनेक गोरगरीब विद्यार्थी, विशेषतः मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांना गावातच पुढील शिक्षण घेता यावे, यासाठी शाळेत इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यास तातडीने मान्यता द्यावी, अशी आर्त साद शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी राज्याच्या वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक विकास व मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे घातली आहे.
शिक्षणासाठी १२ किलोमीटरची पायपीट
भोगाव (देवी) या सुमारे दोन हजार लोकवस्तीच्या गावात जिल्हा परिषदेची उर्दू माध्यमाची शाळा आहे. मात्र, येथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना तब्बल १२ किलोमीटर दूर असलेल्या जिंतूर शहरात जावे लागते. अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आपल्या मुलांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवणे शक्य होत नाही. विशेषतः मुलींना शिक्षणासाठी रोज इतक्या लांब पाठवण्यास पालक तयार नसतात, ज्यामुळे अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते
शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती
शाळेच्या माहितीनुसार, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शाळेत ११६ विद्यार्थी शिक्षण घेत होते. आता नवीन शैक्षणिक वर्षासाठी २५ मुले आणि ११ मुली प्रवेशासाठी इच्छुक आहेत. मात्र, गावात पुढील वर्गांची सोय नसल्याने आणि बाहेरगावी पाठवण्याची ऐपत नसल्याने ही मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, शाळेत नैसर्गिक वाढीनुसार इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शासन आणि प्रशासन काय निर्णय घेणार याकडे पालक-विद्यार्थ्यांचे लक्ष
या मागणीचे निवेदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी, जिंतूर यांच्याकडे सादर केले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी विनंती केली आहे. शाळेतच पुढील वर्गांना मान्यता मिळाल्यास, भोगाव परिसरातील विद्यार्थ्यांना गावातच सुरक्षित वातावरणात आपले शिक्षण पूर्ण करता येईल. त्यामुळे आता यावर शासन आणि प्रशासन काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे डोळे लागले आहेत.

