Beautiful School : 'सुंदर शाळा'चा निकाल सात महिन्यांपासून रखडला

मूल्यांकन पूर्ण; शिक्षक- मुख्याध्यापकांचा उत्साह मावळला, ७२.२२ कोटींच्या पुरस्कारांकडे शाळांचे लक्ष
Beautiful School Competition
Beautiful School : 'सुंदर शाळा'चा निकाल सात महिन्यांपासून रखडलाfile photo
Published on
Updated on

'Beautiful School' results stalled for seven months

नरहरी चौधरी

परभणी : राज्यातील शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा उंचावण्यासाठी शासनाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या महत्त्वाकांक्षी स्पर्धेचा निकाल तब्बल सात महिन्यांपासून रखडला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये स्पर्धेची अंतिम मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, सप्टेंबर महिना अर्धा उलटला तरी अंतिम निकाल जाहीर झालेला नसल्याने शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Beautiful School Competition
Parbhani|चीनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. स्वाती भिसे यांची निवड

शाळा सुंदर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शिक्षकांच्या उत्साहावरच या दिरंगाईने पाणी फेरले आहे. शाळांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच चांगले आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण मिळावे, शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा राबविण्यात आली.

राज्यातील शाळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक शाळांनी शाळेचा परिसर, स्वच्छता, वृक्षारोपण, शैक्षणिक साधने, डिजिटल सुविधा, विद्यार्थ्यांचे उपक्रम, गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न आदी बाबींवर विशेष भर दिला. स्पर्धेच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांनी नियमित शैक्षणिक कामकाजासोबत अतिरिक्त वेळ देऊन विविध उपक्रम राबविले.

शाळेचा परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीपर्यंत विविध बाबींमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले. काही शाळांनी लोकसहभागातून सुविधा निर्माण केल्या, तर काहींनी उपलब्ध निधीतून शाळेचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. अंतिम मूल्यांकनाच्या वेळी संबंधित शाळांनी आपली कामगिरी आणि उपक्रम सादर केले.

Beautiful School Competition
परभणी : महागाव येथे वीज कोसळून महिलेचा मृत्यू, शेतात काम करत असताना घडली घटना

मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना होती. मात्र, एक-दोन महिने नव्हे, तर तब्बल सात महिने उलटूनही निकाल जाहीर न झाल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. या स्पर्धेतील विजेत्या शाळांना राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. शासनाने या पुरस्कारांसाठी तब्बल ७२.२२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या शाळेला ५१ लाख रुपये, विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाला २१ लाख रुपये, तर जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या शाळेला ११ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. या पुरस्कारातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग शाळांच्या पुढील विकासासाठी करता येणार असल्याने विजेत्या शाळांसह शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.

मात्र, निकालच जाहीर होत नसल्याने पुरस्काराची रक्कम कधी मिळणार आणि त्यातून विकासकामे कधी सुरू होणार, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. स्पर्धेसाठी शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक शिक्षकांनी वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना सहभागी करून विविध उपक्रम राबविण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थांचाही सहभाग घेण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रयत्नानंतर अंतिम मूल्यांकन होऊनही निकालाची घोषणा न झाल्याने संबंधितांमध्ये निराशा आहे. शाळांमध्ये गुणवत्ता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश असताना निकालाच्या विलंबामुळे त्यालाच तडा जात असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

भविष्यातील स्पर्धांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा उत्साह कायम ठेवायचा असेल, तर शासनाने निकालाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही बोलले जात आहे. शासनाने या दिरंगाईची कारणे स्पष्ट करून तातडीने अंतिम निकाल जाहीर करावा. विजेत्या शाळांना पुरस्काराची रक्कम लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापकांकडून होत आहे.

अनेक शाळांना उत्सुकता

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हा शासनाचा अतिशय स्तुत्य व शाळांना सुसज्ज आणि सर्वार्थाने समृद्ध करण्यास सातत्याने प्रेरणा देणारा उपक्रम आहे. कार्याला आणि सामाजिक सहभागासोबत नाविन्यपूर्णतला चालना देणारा उपक्रम असल्यामुळे त्याच्या स्पर्धेच्या निकालातून गती मिळते. परंतु गेल्या सात ते आठ महिन्यापासून सदर स्पर्धेचा निकाल प्रलंबित असून अनेक प्रगतशील शाळा आणि शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. शासनाने लवकर निकाल घोषित करून शाळांना न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे, असे पीएमश्री जि.प. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रेमेंद्र भावसार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news