

परभणी : महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार मागील दोन वर्षांपासून शासन दरबारी धुळखात पडल्याने या प्रकारापासून गौरव होणाऱ्या संस्था व व्यक्ती वंचित राहिल्याचे पहावयास मिळत आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दरवर्षी हा पुरस्कार एक स्वयंसेवी संस्था, तीन डॉक्टर, तीन पत्रकार आणि पाच कर्मचारी यांना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी दहा सदस्यांची समितीही गठीत करण्यात आली आहे, जी पाठवलेल्या प्रस्तावांची निवड करते. मात्र, मागील दोन वर्षांपासून या पुरस्कारासाठी पाठवलेले प्रस्ताव मंत्रालयात कार्यवाहीसाठी अडकले आहेत, ज्यामुळे अनेक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अपेक्षित गौरव मिळत नाही. सरकारी स्रोतांच्या माहितीनुसार, पुरस्काराचे उद्दिष्ट आरोग्य सेवा अधिक प्रभावी करणे, आरोग्य उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागात आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे असे आहे. या पुरस्कारामुळे आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा, असे अपेक्षित आहे. या वितरित होणाऱ्या पुरस्काराच्या विलंबामुळे काही पुरस्कारासाठी प्रस्तावित उमेदवारांमध्ये निराशा निर्माण झाली आहे, तसेच योजनेची प्रतिष्ठा देखील प्रभावित झाली आहे. आरोग्य विभागाने लवकरच प्रस्तावांची कार्यवाही करून विजेत्यांची घोषणा करणे गरजेचे बनले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी सन्मानित करण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार योजना पुन्हा राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. या पुरस्कारासाठी पाठवलेले प्रस्ताव मंत्रालयात धुळखात होते, मात्र २०२३_२४ मध्ये राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. या पुरस्काराची सुरुवात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर करण्यात आली असून, उद्दिष्ट हे आरोग्य सेवा अधिक प्रभावी करणे, प्रजनन व बाल आरोग्य सुधारणा करणे, कुटुंब कल्याण उपक्रम यशस्वी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे आहे. यातून दरवर्षी एकूण दहा पुरस्कार देण्याचे निश्चित आहे. यामध्ये आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्था १ पुरस्कार 1 लाख, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर ३ पुरस्कार, प्रत्येकी 1 लाख, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार १ पुरस्कार 1 लाख, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी ५ पुरस्कार प्रत्येकी 1 लाख अशा प्रकारे एकूण अंदाजित खर्च 20 लाख इतका आहे. यात जाहिरात, समारंभ, छायाचित्रण, व्हिडीओ शुटींग आणि रोख पुरस्कार रक्कम यांचा समावेश आहे
आरोग्य उपसंचालक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविली जात आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हा स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी दि.२३ जानेवारी रोजी आयोजित करण्याचा मानस आहे. योजनेची अंमलबजावणी २०१९ च्या आधीच्या शासन निर्णयानुसार केली जाईल असे म्हटले आहे. संबंधित खर्च २०२३-२४ साठी मंजूर अनुदानातून भागविला जावा असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले होते. यामध्ये डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त व्यक्ती या पुरस्कारासाठी विचारात घेतली जाणार नाही असेही नमूद केले असले तरी या पुरस्कारापासून संस्था व व्यक्ती वंचितच राहिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.