Purna Hunger Strike | पूर्णा-हिवरा रस्ता कामासाठी बाबाराव ढोणे यांचे आमरण उपोषण; कंत्राटदार आणि प्रशासनाविरोधात संताप

सहा महिन्यांपासून काम ठप्प; निकृष्ट दर्जा आणि बेकायदेशीर उत्खननाचा आरोप
Hunger Strike
बाबाराव ढोणे पाटील यांनी २५ फेब्रुवारीपासून पूर्णा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेPudhari
Published on
Updated on

Purna Hivra Road

पूर्णा: तालुक्यातील पूर्णा ते पांगरा मार्ग हिवरा या 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजने'अंतर्गत (पॅकेज क्र. MH 2293) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून रखडले आहे. कंत्राटदाराचा मनमानी कारभार आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे संताप व्यक्त होत असून, हे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने सुरू व्हावे या मागणीसाठी 'सरपंच मंगेशभाऊ साबळे युवा मंचा'चे प्रदेशाध्यक्ष बाबाराव ढोणे पाटील यांनी २५ फेब्रुवारीपासून पूर्णा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

नेमका आरोप काय?

लातूर येथील मे. आशीर्वाद कन्स्ट्रक्शनला या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. उपोषणकर्ते बाबाराव ढोणे यांनी खालील गंभीर आरोप केले आहेत:

निकृष्ट काम: कंत्राटदाराने सुरुवातीला जुनाच रस्ता उखडून तेच मेटल वापरून थातूरमातूर मजबुतीकरण केले.

बेकायदेशीर उत्खनन: कंत्राटदार आणि समृद्धी महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतून विनापरवाना गौण खनिज उत्खनन केले, मात्र शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिला नाही.

अपघातांचे सत्र: अर्धवट कामामुळे रस्त्यावर खडी पसरली असून, पादचारी आणि दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत. याला सर्वस्वी संबंधित अभियंते आणि गुत्तेदार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भ्रष्टाचाराचा संशय: निकृष्ट कामाकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांचे निलंबन करावे आणि संबंधित गुत्तेदाराचा परवाना रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Hunger Strike
Purna Farmer | कंठेश्वर शिवारात महावितरणचा निष्काळजीपणा नडला! शॉटसर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक

प्रशासनाचा दावा: 'समृद्धी'च्या जड वाहनांमुळे खोळंबा

या संदर्भात महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे (परभणी) कार्यकारी अभियंता कृष्णा वाघ यांनी खुलासा केला आहे. त्यांच्या मते:

"पूर्णा ते हिवरा रस्त्याच्या कामात 'मोंटोकार्लो' कंपनीच्या समृद्धी महामार्गासाठी वापरल्या जाणाऱ्या जड वाहनांचा मोठा अडथळा आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ता खराब होत असून, वारंवार पत्रव्यवहार करूनही समृद्धी महामार्ग व्यवस्थापनाने वाहतूक बंद केलेली नाही. वाहतूक बंद झाल्याशिवाय पुढील काम करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. याबाबत आरटीओ आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही."

उपोषण मागे घेणार नाही!

"जोपर्यंत प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू होत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही," असा कडक इशारा बाबाराव ढोणे यांनी 'पुढारी'शी बोलताना दिला आहे. या आंदोलनामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news