

Tadkalas Purna Farmer Death
ताडकळस : ताडकळस येथून जवळच असलेल्या तामकळस (ता. पूर्णा) येथील दिंगबर तुकाराम तनपुरे यांनी गळफास लावून जीवन संपविले. अतिवृष्टीची झळ, पिकांचे नुकसान, वाढता आर्थिक ताण आणि परतफेडीची वेळ जवळ येत असलेली पीककर्जाची देणी या सगळ्या विवंचनेचा भार मनावर आल्याने एका तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले.
तामकळस (ता. पूर्णा, जि. परभणी) येथे दिगंबर तुकाराम तनपुरे (वय ३३) या तरुण शेतकऱ्याने नापिकीच्या ताणाला कंटाळून राहत्या वस्तीवरील घरात गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना आज (दि. ११) सकाळी उघडकीस आली. पोटाची खळगी भरण्यासाठी राबणारा आणि मातीतून सोनं उगवण्याचा प्रयत्न करणारा एक शेतकरी शासनाच्या योजनांच्या कागदोपत्री मदतीतच अडकून राहिल्याने मृत्यूकडे ढकलला गेला, अशी हळहळ गावकऱ्यांनी व्यक्त केली.
दिगंबर तनपुरे शेती व्यवसाय करत होते. परिसरातील अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचवेळी एसबीआयचे घेतलेले पीककर्ज आणि घरातील आर्थिक जबाबदाऱ्यांचा डोंगर वाढतच गेला. "कर्ज कसं फेडायचं? "घर सांभाळायचं कसं?" अशा प्रश्नांनी पिडलेल्या या तरुण शेतकऱ्याने नैराश्यातून टोकाचा निर्णय घेतला.
याबाबतची माहिती मृताचे भाऊ दत्ता तुकाराम तनपुरे (वय २१) यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात दिली. ताडकळस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काठेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुजलोड करीत आहेत.
गावातील अनेक शेतकरी आर्थिक संकटाशी दररोज झुंज देत आहेत. मात्र, शासन पातळीवर शेतकऱ्यांसाठी जाहीर केल्या जाणाऱ्या मदत योजना आणि कर्जमाफीचे आश्वासने प्रत्यक्षात पोहोचत नसल्याने अनेक कुटुंबांवर आत्महत्येचे सावट अधोरेखित होत आहे.