

आनंद ढोणे
पूर्णा तालूक्यातील देऊळगाव दुधाटे येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राखीपोर्णिमेनिमित्त 'एक राखी सैनिकांसाठी..तुमच्या-आमच्या रक्षणासाठी' हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला. विशेष म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वतःच्या खाऊचे पैसे वाचवून खरेदी केलेल्या साहित्यातून राख्या बनविल्या आहेत. येथील शाळेच्या इयत्ता 3 री ते 7 वी च्या विद्यार्थी,विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले होते.
त्यांनी स्वत: आपल्या भारतीय सैनिकांसाठी २७० राख्या बनविल्या. भारतीय शूरवीर सैनिकांसाठी राख्या बनविण्याचा आंनद सर्वच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. दुसरे साध्य म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थिनींना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण मिळाले. या उपक्रमासाठी लागणारे साहित्य शिक्षक आबनराव पारवे यांनी उपलब्ध करून दिले. मागील वर्षी पासून शाळेत हा उपक्रम अगदी दर्जेदारपणे राबविला जात आहे.आता हे या राष्ट्रीय उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे.गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर,केंद्रप्रमुख प्रमोद आंबोरे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.शाळेचा सर्वांगीण विकास करणारे उपक्रमशील शिक्षक बळीराम कदम, गंगाधर लांडे , मुंजादेव मुंडे ,शत्रूग्न मिराशे , शिवकुमार बोडगमवार यांनी लागणारे सर्व सहकार्य केले. श्रीमती वैशाली शिशोदे यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.सदर शाळेतील रुचकर भोजन बनविणाऱ्या द्वारका परसे यांनी पण विद्यार्थ्यांसोबत राख्या बनविण्याचा मनसोक्त आनंद घेतला.या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती व समस्त गावकरी मंडळींचे अनमोल सहकार्य लाभले.