महायुतीत जागा सुटण्यावरून मोठा संभ्रम

जिंतूर वगळता तिन्ही मतदारसंघात पेच
Maharashtra Politics |
महायुतीत जागा सुटण्यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.File Photo
Published on
Updated on

परभणी : विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतरही जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील जागा वाटप व उमेदवार निश्चितीवरून महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाल्याने इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची मोठी स्थिती उद्भवली आहे. महायुतीच्या विद्यमान २ आमदारांमध्ये जिंतूर वगळता राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळावर लढण्याच्या जाहीर केलेल्या भूमिकेने गंगाखेडमध्ये उत्कंठता लागली आहे. परभणी व पाथरीत जागा वाटपाचे चित्रच स्पष्ट होत नसल्याने इच्छुकांची मोठी कोंडी झाली आहे.

महायुतीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा तीन पक्षांसह मागील निवडणुकीतील रासपचाही आतापर्यंत समावेश होता. विद्यमान आमदारांमध्ये जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर (भाजप), गंगाखेडमध्ये डॉ. रत्नाकर गुट्टे (रासप) या दोघांचा समावेश आहे. परभणीत डॉ. राहुल पाटील (शिवसेना ठाकरे गट) तर पाथरीत सुरेश वरपुडकर (काँग्रेस) हे दोन महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे चार मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी ही प्रतिनिधीत्वाच्या बाबतीत समसमान आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीत या चार जागांचे वाटप कसे होणार याकडे लक्ष लागलेले असताना आतापर्यंत जिंतूर व गंगाखेड हे विद्यमान आमदारांच्या पक्षाकडे राहतील हे निश्चित होते. जिंतूरबाबत ही निश्चितता आजही कायम आहे. मात्र गंगाखेडमध्ये रासपचे नेते महादेव जानकर यांनी स्वबळावर लढविण्याचे जाहीर केल्यामुळे आता तेथेही पेच निर्माण झाला आहे. पाथरी व परभणीत शिवसेना शिंदे गट की अजित पवार गट यांच्याकडे कोणती जागा सुटेल, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

परभणीत भाजप की शिंदे गट

शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या परभणी या शहरी मतदारसंघात महायुतीकडून ही जागा कोणाच्या वाट्याला येईल. याबाबत काहीच स्पष्टता नाही. भाजपने २०१४ मध्ये स्वबळावर लढविली होती. त्यात आनंद ही जागा भरोसे यांचा पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने या जागेवर आपला दावा केला आहे. भाजपचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांच्यासह डॉ. केदार खटिंग यांचे नाव भाजपतर्फे चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटानेही धनुष्यबाण चिन्हाच्या आधारे या जागेवर आपला दावा भक्कमपणे केला असून काही पदाधिकारी उमेदवारीच्या अपेक्षेने तयारीलाही लागले आहेत. त्यात अप्पाराव कारेगावकर, जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे या दोघांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणीही इच्छुक नाही.

पाथरीत राष्ट्रवादी की शिंदे गट

पाथरी विधानसभा मतदारसंघ आजपर्यंत भाजपनेच लढवलेला असून माजी आ. मोहन फड यांनी २०१४ च्या निवडणुकीत बाजी मारली होती. मात्र २०१९ मध्ये त्यांना पराभवास तोंड द्यावे लागले होते. या पार्श्वभूमीवर महायुतीतून हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाने मिळविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख सईद खान हे त्या दृष्टीने कामालाही लागले आहेत. तर ऐनवेळच्या समीकरणात व जिल्ह्याच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेल्यास तेथून नुकतेच विधान परिषद सदस्य झालेले राजेश विटेकर हे रिंगणात येऊ शकतात. त्यामुळे येथील जागा वाटपाची स्थिती जाहीर झाल्यावरच पदाधिकारी, कार्यकर्ते निश्चित होऊन कामाला लागतील. मात्र सद्यस्थितीत संभ्रमावस्था कायम आहे.

गंगाखेडमध्ये आ. गुट्टेची भूमिका महत्त्वाची

रासपकडून विधानसभेत गेलेले आ. गुट्टे याही वेळी महायुतीत रासपकडूनच रिंगणात येण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीतूनच रासप बाहेर पडत असल्याने ही जागा महायुतीत भाजपच्याच वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे हे देखील गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत आहेत. मात्र कालपर्यंत रासपची भूमिका जाहीर न झाल्याने मुरकुटेंच्या हालचाली देखील फारशा जाणवल्या नाहीत. मुरकुटे यांच्याशिवाय अन्य एखादे नाव देखील उमेदवारीच्या स्पर्धेत येऊ शकते. मात्र आ. गुट्टे यांनीच काही वेगळी भूमिका घेतल्यास येथील जागावाटप व पर्यायाने उमेदवार निश्चितीबाबत प्रश्नच निर्माण होणार नाही. सध्या तरी रासपच्या भूमिकेमुळे या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराबाबत मोठी उत्कंठता निर्माण झाली आहे

जिंतूरमध्ये बोर्डीकर निश्चित

महायुतीत विद्यमान जागा ज्या-त्या पक्षाकडे ठेवण्याचे सूत्र कायम असल्याने सध्या जिंतूर-सेलू मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आ. मेघना बोर्डीकर यांचा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. मतदारसंघ भाजपकडे व पर्यायाने उमेदवारी देखील बोर्डीकरांकडेच राहणार असल्याने त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात आपली तयारी जोरदारपणे चालविली आहे. मागील ५ वर्षांत केंद्र व राज्य सरकारकडून रस्ते व विकासकामांसाठी आणलेल्या निधीवर व केलेल्या कामांवर भर देत आ. मेघना बोर्डीकर ही कामे जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news