औंढा-हिंगोली मार्गावर चारचाकी व टेम्पोची समोरासमोर धडक, चौघेजण जखमी | पुढारी

औंढा-हिंगोली मार्गावर चारचाकी व टेम्पोची समोरासमोर धडक, चौघेजण जखमी

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा-हिंगोली रोडवर येहळेगांव सोळंके शिवारात चारचाकी व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या धडकेत दोन्ही वाहनांतील चौघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना आज (दि. ७ एप्रिल) दुपारी एकच्या सुमारास घडली.

औंढा नागनाथकडून एक चारचाकी (क्र. एम एच ४५ एडी १०९९) हिंगोलीकडे जात होती. दरम्यान या चारचाकीच्या पाठीमागे तीन चाकी टेम्पो (क्र. एम एच ३८ ई १९१६) होता. भरधाव वेगात असलेल्या चारचाकीचे पुढील टायर फुटले. यावेळी चारचाकी जागेवरच फिरल्याने पाठीमागून येणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली.  यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यांमध्ये पलटी झाला. सुदैवाने या अपघातामध्ये जिवीत हानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघातामध्ये चारचाकीमधील रवींद्र शिवाजी शेंडगे (वय 58), जितेंद्र शिवाजी शेंडगे (वय 54), महेंद्र जितेंद्र शेंडगे (वय 24) सर्व राहणार हिंगोली तर दिलीप मुंजाजी भालेराव (वय 52 रा. हिंगोली) हे चौघेजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सदरील घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक राहिरे, जमादार हरकाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी झालेल्यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून हिंगोलीला रेफर केले व औंढा पोलीस ठाण्यामध्ये पुढील प्रक्रिया चालू होती.

Back to top button