परभणी : टेम्पोच्या धडकेत मजूर जागीच ठार, एक गंभीर | पुढारी

परभणी : टेम्पोच्या धडकेत मजूर जागीच ठार, एक गंभीर

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : परभणी रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय परिसरात आज (दि. ६ मार्च) दुपारी ३ च्या दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एकजण जागीच ठार झाला आहे. तर एक गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्राथमिक उपचार जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून दरम्यान घटना घडताताच घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान ठार झालेला व्यक्ती साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास आला होता.

दरम्यान अधिक माहिती अशी की, शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात नोंदणीकृत मजुरांना संसारोपयोगी साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अण्णा रावजी खिल्लारे (वय ५० वर्षे) व अशोक नारायण चव्हाण (वय ३५ वर्ष रा.माणकेश्वर, ता. जिंतूर) हे दोघेजण साहित्य घेण्यासाठी मानकेश्वरहून दूचाकीने परभणी रोडकडे जात असताना पाठीमागून आयशर वाहनाने भरधाव वेगात दुचाकीस उडवले. यावेळी दुचाकीवरील दोघे जण रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. घटना घडताच आयशर चालकाने वाहन घेऊन पळ काढला यावेळी नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून अण्णा रावजी खिल्लारे यास मृत घोषित केले. तर अशोक नारायण चव्हाण यांच्या हाताला व डोक्याला गंभीर मार असल्यामुळे प्रकृती चिंताजनक झाली होती. म्हणून त्यांना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान मयताच्या पश्चात पत्नी चार मुली एक मुलगा असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात याबाबत कोणती नोंद झाली नव्हती.

Back to top button