परभणी, पुढारी वृत्तसेवा : वयोश्री योजनेतंर्गत मोजमाप तपासणीतील ४ हजार ज्येष्ठांना विविध प्रकारच्या १७ हजार साहाय्यक साधनांची मोफत वाटप शुक्रवारी (दि.४) पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्य सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय व व आ.डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून ही योजना राबविण्यासाठी नूतन महाविद्यालयात ८ व ९ फेब्रुवारी रोजी तपासणी शिबीर घेण्यात आले होते. त्यात ४ हजार नागरिक सहायक साधने मिळण्यासाठी पात्र ठरले होते. या सर्वांचे सर्व साहित्य प्राप्त झाले असून त्याचे वाटप शुक्रवारी सकाळी १० वाजता होणार आहे.
यामध्ये ज्येष्ठांना चालण्याची काठी, कोपर काठी, अॅल्युमिनीयम कुबड्या, तीन पायाची काठी, चार पायाची काठी, श्रवण यंत्र, घडीचे वॉकर, नंबरचा चष्मा, चाकांची खुर्ची, कमोड व्हीलचेअर, कमोड खुर्ची इ. विविध २० प्रकारच्या साहित्यांची समावेश आहे. ज्या नागरिकांनी फेब्रुवारीतील शिबिरात तपासणी केली होती. त्यांनी ही साहाय्यक साधने घेण्यासाठी शुक्रवारी आर.पी. हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रीय वयोश्री योजनेतंर्गत प्रत्येक जिल्ह्याला ५ हजार लाभार्थी निवडीचे निकष आहेत. या अंतर्गत एकट्या परभणी विधानसभा मतदारसंघातून ४ हजार लाभार्थीची निवड झाली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ देशातील २० राज्यांत प्रथम आला आहे. परभणी मतदारसंघातील सर्वाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आ. डॉ. राहुल पाटील यांना यश आले आहे.