

परभणी, पुढारी वृत्तसेवा ः शहरात ध्वनी प्रदुषण करताना आढळून आलेल्या मोटारसायकलींवर कारवाई करताना जप्त केलेले तब्बल 445 सायलेन्सर शहर वाहतूक शाखेने शनिवारी (दि.17) नष्ट केले. पोलिस मुख्यालयातील वाहतूक शाखेच्या परिसरात या सायलेन्सरवरून चक्क रोडरोलर फिरवून त्याचा चुराडा करण्यात आला. या सायलेन्सरची किंमती 13 लाख 50 हजार रूपये इतकी आहे.
शहरात मोटारसायकलधारक बर्याच वेळा सायलेन्सरमध्ये बदल करून त्याचा आवाज वाढवितात. विशेषतः बुलेट व अन्य बाईकमध्ये असे प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. या वाढत्या आवाजाचा वाहतुकीबरोबरच ध्वनी प्रदुषण वाढण्यात परिणाम होतो. अन्य वाहनधारकांना त्याच्या कर्णकरष्य आवाजाचा भयंकर त्रास होतो.
याबाबत शहर पोलिस वाहतूक शाखेने ध्वनी प्रदुषण करणार्या अशा वाहनांवर मागील 2 वर्षात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती. त्यातून 445 सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. साधारणतः प्रत्येक सायलेन्सरची किंमत 3 हजार रूपये इतकी आहे. पोलिस नियमानूसार जप्त केलेले सायलेन्सर लगेचच नष्ट करता येतात. परंतू वाहतूक शाखेने ते जमा केल्यानंतर त्यांची संख्या मोठी असल्याने ते एकदाच रोडरोलर फीरवून नष्ट करण्यात आले, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी दिली. पोलिस अधिक्षक रागसुधा आर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपअधिक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन इंगेवाड, फौजदार मकसूद पठाण, राजेश्वर जुकटे आदींसह कर्मचार्यांनी ही कारवाई केली.