

सोनपेठ; पुढारी वृत्तसेवा : प्रगतशील शेतकरी तथा महाराष्ट्र कृषीभूषण पुरस्कार प्राप्त नाथराव कराड यांची शिवसेना प्रणीत शेतकरी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती पत्र देऊन शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याची जबाबदारी दिली. मागील पंधरा वर्षांपासुन नाथराव कराड यांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कार्य केल्याबद्दल त्यांना कृषि मार्गदर्शक, कृषी संशोधक, कृषी भुषण, कृषी मित्र आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सोनपेठ तालुक्यातील धामोणी परिसरात त्यांनी कृषी मेळावा, कृषी प्रदर्शनाचे देखील आयोजन केले होते. अनेक वेळा दूरचित्रवाहिनीवर त्यांच्या कृषी विषयक मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. कराड यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रणित शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मित्र परिवारातून अभिनंदन करण्यात येत आहे. नाथराव कराड यांना शेतीविषयक व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी विषयी माहिती असल्यामुळे पुढील काळात ते राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.