

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा: जिंतूर-जालना रोडवरील हलवीरा पाटी येथील गजानन महाराज मंदिराजवळ जोगवाडा येथील तरुणाचा दुचाकीला रानडुक्कर धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना २४ मेरोजी घडली होती. या घटनेत आणखी एक तरूण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा आज (दि. २८) उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच गावातील दोन तरुणांच्या मृत्यूवर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जोगवाडा येथील भास्कर रथकर व भारत रथकर दोघेजण जोगवाड्यावरून चारठाणा येथे कामानिमित्त दुचाकीवरून जात होते. जालना रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ अचानक रानडुकर चालत्या दुचाकीला धडकल्यामुळे दोघेजण खाली कोसळून गंभीर जखमी झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच गावातील तरुणांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दोघांना दाखल केले होते. भास्कर रथकर यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेले भारत रथकर यांच्यावर परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले होते. परंतु मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने भारत रथकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे.
हेही वाचा