गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : गेल्या पाच दिवसांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले भारतीय विद्यार्थी भयभीत झाले आहेत. भारतीय राजदूत विद्यार्थ्यांना कुठले सहकार्य करीत नाहीत, शिवाय विद्यार्थ्यांचे फोन सुद्धा राजदूतांनी बंद केल्याच्या निषेधार्थ जवळपास ४५ भारतीय विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री उशिराने ओडेसा ते मालदोओ हे तब्बल दोन तासाचे अंतर जीव धोक्यात घालून स्वखर्चाने खासगी बसद्वारे पार केले असून माल्दोवामध्ये असलेल्या बहुसंख्य भारतीयांच्या सकारात्मक सहकार्यामुळे संबंधित ४५ विद्यार्थी सुरक्षित असून आम्हाला लवकरात लवकर भारत सरकारने आपल्या मायभूमीत घेऊन जावे, अशी आर्त हाक आता संबंधित विद्यार्थी देऊ लागले आहेत.
पाच दिवस रशिया विरुद्ध युक्रेन अशी युद्धाची धुमश्चक्री सुरू असताना भारतीय दूतावास तेथे शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना योग्य सहकार्य करत नसल्याची नाराजी आता युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांत पसरत आहे. कारण आपल्या मायदेशी परतण्याची ओढ लागलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क साधूनही भारतीय राजदूत सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत, शिवाय फोनही उचलत नाहीत अशी उघड नाराजी तब्बल दोन दिवस ओडेसा भागात बंकरमध्ये जीव वाचवून बसलेल्या विद्यार्थ्यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली आहे.
अखेर संबंधित ४५ भारतीय विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वखर्चाने खासगी बस करून ओडेसा भागापासून तब्बल दोन तासाच्या अंतरावर असलेल्या आणि युद्ध पार्श्वभूमीवर सुरक्षित ठिकाण म्हणूनच समजल्या जाणाऱ्या माल्दोवा भागात रविवारी उशिरा प्रवेश केला आहे. या संपूर्ण प्रवासाकरिता माल्दोवा सरकारने संबंधित भारतीय विद्यार्थ्यांना व्हिजा प्राप्त करुन दिला असून संबंधित ४५ विद्यार्थी माल्दोवानंतर रोमानियामार्गे भारतात जलदतेने परतण्याची अपेक्षा ठेवून आहेत.
दरम्यान माल्दोवा भागात भारतीय नागरिक मोठ्या संख्येने राहतात. तेथील भारती यांनी संबंधित ४५ विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवण्याची सोय अत्यंत चांगल्या पद्धतीने केली असून तेथील भारतीयांच्या सहकार्यामुळेच आज परिस्थितीत संबंधित ४५ विद्यार्थी स्वतःला सुरक्षित मानत आहेत. परंतु भारत सरकारने आता लवकरात लवकर आम्हाला मायदेशी परत घेऊन जावे अशी आर्त हाक संबंधित विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
"राजपुतांचे असहकार्य, आता तरी लवकर मायदेशी घेऊन जा"
आम्ही सर्व भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये आता असुरक्षित झालो आहोत. भारतीय राजदुतांच्या असहकार्यामुळे आम्हाला मोठा मानसिक धक्का बसला असून आम्ही स्वजबाबदारीवर माल्दोवा येथे येऊन स्थिरावलो आहोत. माल्दोवा येथील भारतीय आम्हाला सहकार्य करीत आहेत म्हणून आम्ही स्वतःला सुरक्षित समजत आहोत. येथून आम्हांस रोमानियाजवळ असून भारतीय सरकारने आम्हास लवकरात लवकर आता मायदेशी घेऊन जावे.
– संकेत पाठक, युक्रेनमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी.