

नांदेड: दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, यंदा शिधापत्रिकाधारकांना साखरेसोबतच 'आनंदाचा शिधा'ही मिळणार नाही. आचारसंहितेपूर्वी यावर निर्णय घेतला नसल्याने, यंदा दिवाळीत जिल्ह्यातील पाच लाख ३५ हजार शिधापत्रिकाधारकांच्या दिवाळीतील 'गोडवा' कमी होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात पाच लाख ३५ हजार २०१ शिधापत्रिकाधारक आहेत. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधरक तसेच दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस समाविष्ट असलेला संच आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय शासनाने जुलै महिन्यात घेतला होता. यापूर्वी दिवाळीसह अन्य सण-उत्सवानिमित्त वितरण करण्यात आले. त्यानंतर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 'आनंदाचा शिधा' वितरित करण्यात आला. ई-पॉश प्रणालीद्वारे १०० रुपयांमध्ये प्रतिसंच या सवलतीच्या दराने आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला. यामुळे गरीब कुटुंबांना सण उत्सवात याचा आधार मिळतो, त्यामुळे लाभार्थी त्याची वाट पाहुन होते.
परंतु, यंदा आचारसंहितेमुळे शासनाने निर्णय घेतलेला नसल्याने लाभार्थ्यांना आनंदाच्या शिध्यापासून वंचित राहावे लागणार आहे. पुरवठा विभागाने एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे एक हजार ६४८ क्विंटल साखरेची मागणी केली होती. तीही मिळालेली नाही. त्यामुळे आहे त्या शिधाजिन्नसवरच कार्डधारकांना समाधान मानावे लागणार आहे.
नेहमीप्रमाणे मागणीच्या तुलनेत यंदाही शिधाजिन्नसचा जिल्ह्यासाठी पूर्ण पुरवठा झाला नाही. साखर, रवा तर कुठे तेल गौरी-गणपती व दसऱ्यानंतरही आलेले नाहीत. त्यामुळे आता उपलब्ध शिधाजिन्नसचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. यात मुदखेड (९४ टक्के), देगलूर (९१), लोहा (९१), भोकर (९०), हिमायतनगर (८९), धर्माबाद (८९), नायगाव (८९), कंधार (८५), किनवट (८३), अर्धापूर (८२), उमरी (८९), नांदेड (५९), मुखेड (६७), बिलोली (६६), हदगाव (६१), माहूर (४१) असे एकूण ७८ टक्के वाटप झालेले आहे.
दिवाळीसाठी वरिष्ठस्तरावरून आनंदाचा शिधाबाबत काही सूचना आल्या नाहीत. तसेच तीन महिन्यांपूर्वी नियमित वाटपासाठी साखरेची मागणी करण्यात आली होती. परंतु, तिही आली नाही. गौरी-गणपती शिधाजिन्नसचे मोकळ्या पद्धतीने वाटप सुरू असून, आतापर्यंत ७८ टक्के वाटप झाले आहे.
रुपाली चौगुले, जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड