

Nagpur Tuljapur Road Two-wheeler Accident Youth killed
उमरखेड : लग्नासाठी हदगाव येथे दुचाकीवरून जात असताना सुकळी (ज.) उड्डाण पुलाजवळ दुचाकी दुभाजकाला धडकून एक ठार तर एक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना आज (दि.४) सकाळी ११. ३० च्या सुमारास घडली. विलास पुंडलिकराव इंगळे (वय ४८, रा. महागाव) असे मृताचे नाव आहे. तर मनोज परसराम कदम (वय ३६, रा. महागाव) असे जखमीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाव येथून हदगाव येथे दुचाकीवरून (एम एच 29 बी जे 95 87) दोघे लग्नासाठी जात होते. नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सुकळी (ज.) उड्डाण पुलाजवळ दुचाकी दुभाजकावर आदळली. यात विलास इंगळे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला. तर मनोज कदम यांच्या पायाला गंभीर मार लागला.
घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरखेड रुग्णालयात हलविला. मृत विलास हा माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचा मेहुणा आहे. दुर्घटनेची माहिती कळताच नजरधने यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली.