Yavatmal News: मुलांना खेळ शिकवणार कोण? यवतमाळमधील ३० टक्के शाळांमध्ये क्रीडा शिक्षकच नाहीत

यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ३० टक्के शाळांमध्ये क्रीडा शिक्षकच उपलब्ध नसल्याची धक्कादायक आणि चिंताजनक बाब समोर आली असून सरकारविरूद्ध संतप्त प्रतीक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहेत.
School sports
School sportsFile Photo
Published on
Updated on

Yavatmal sports teacher recruitment

उमरखेड: विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी आणि क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी शासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक शाळेला किमान दोन सांघिक आणि एका वैयक्तिक खेळ प्रकारात सहभागी होण्याची सक्ती क्रीडा विभागाने केली आहे. यासाठी सध्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. मात्र, एकीकडे स्पर्धांची सक्ती करत असताना, दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ३० टक्के शाळांमध्ये क्रीडा शिक्षकच उपलब्ध नसल्याची धक्कादायक आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. क्रीडा शिक्षकांभावी उमरखेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना आपल्या संघांची नोंदणी कशी करावी, असा मोठा पेच पडला असून शाळांसमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात क्रीडा शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्णपणे रखडली आहे. गेल्या १३ वर्षांत सेवानिवृत्तीमुळे अनेक क्रीडा शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत, परंतु शासनाकडून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. दरम्यानच्या काळात सुरू असलेल्या समायोजन प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. समायोजन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सध्या जिल्ह्यात आणि राज्यात क्रीडा शिक्षकांची नेमकी किती पदे रिक्त आहेत, याचे अधिकृत चित्रही स्पष्ट होऊ शकलेले नाही. क्रीडा शिक्षकच नसल्याने उमरखेड तालुक्यातील अनेक ग्रामीण व शहरी शाळांमधील क्रीडा मैदाने ओस पडली आहेत.

९४ पैकी ९० क्रीडा प्रकार तालुका पातळीवर; मार्गदर्शकांचा मात्र दुष्काळ

शासकीय नियोजनानुसार यंदा शालेय क्रीडा स्पर्धा एकूण ९४ क्रीडा प्रकारांत आयोजित केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, यातील ९० खेळांच्या स्पर्धा थेट तालुका पातळीवर होणार आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा आणि ग्रामीण भागातून नवे खेळाडू पुढे यावेत, हा यामागील शासनाचा मुख्य उद्देश आहे. क्रीडा नियोजन बैठकीत या स्पर्धांची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र, उमरखेड तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे मूलभूत नियम शिकवण्यासाठी आणि सराव करून घेण्यासाठी मार्गदर्शक (क्रीडा शिक्षक) नसल्याने, केवळ सक्ती पोटी कागदोपत्री संघ उतरवण्याची वेळ शाळांवर आली आहे.

क्रीडा शिक्षक महासंघाची आक्रमक भूमिका

क्रीडा शिक्षकांच्या रखडलेल्या भरतीमुळे राज्यातील क्रीडा संस्कृती धोक्यात आली असून, शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधताना 'महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे' राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांनी शासनाकडे तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने समायोजन प्रक्रियेला दिलेल्या स्थगितीमुळे निर्माण झालेला पेच लवकरात लवकर सोडवून शिक्षक भरतीचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच राज्यातील केंद्र शाळांमध्ये मंजूर असलेली ४,८६० क्रीडा शिक्षकांची नवीन पदे तातडीने भरण्यात यावीत, जेणेकरून प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळेल, असे धारुरकर यांनी स्पष्ट केले आहे.

पालक आणि क्रीडाप्रेमींमधून संतप्त प्रतीक्रीया

उमरखेड तालुका हा नेहमीच कबड्डी, खो-खो आणि ॲथलेटिक्स सारख्या खेळांमध्ये अग्रेसर राहिला आहे. येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. मात्र शाळांमध्ये क्रीडा शिक्षकच नसतील, तर विद्यार्थ्यांनी सराव कसा करावा आणि स्पर्धांमध्ये कशाच्या जोरावर उतरावे, अशी संतप्त प्रतीक्रिया तालुक्यातील पालकांकडून व्यक्त होत आहे. शासनाने केवळ स्पर्धांची सक्ती न करता, आधी शाळांना हक्काचे क्रीडा शिक्षक द्यावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news