

नांदेड : आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि विधिमंडळीय कारकीर्दीत ‘एक पक्ष एक झेंडा’ या भूमिकेतून शेकापशी एकनिष्ठ राहिलेल्या दिवंगत केशवराव धोंडगे यांच्या पश्चात कन्या चित्रा लुंगारे आणि ज्येष्ठ पुत्र मुक्तेश्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधून घेतलेले असताना धाकटे पुत्र प्रा.पुरुषोत्तम धोंडगे यांनी मंगळवारी आपल्या सासर्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन स्वीकारले.
प्रा.धोंडगे यांचे सासरे व कंधारचे माजी आमदार रोहिदास चव्हाण शिवसेना (उबाठा) पक्षात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी सासरे-जावईबापूंनी ठाकरे यांची मुंबईमध्ये भेट घेऊन पक्षप्रवेशासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती. तेथून परतल्यानंतर मागील पंधरवड्यात आपल्या सहकार्यांशी चर्चा-विचारविनिमय केल्यानंतर मंगळवारी त्यांनी नवा राजकीय प्रवास सुरू केला. शिवसेनेचे उपनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. केशवराव धोंडगेंच्या हयातीतच त्यांच्या मुलांनी शेकापची वाट सोडली होती. ज्येष्ठ पुत्र मुक्तेश्वर यांनी भाजपा आणि एकत्रित शिवसेनेमध्ये काही काळ संचार केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.
त्यांच्या भगिनी चित्राताई लुंगारे याही याच पक्षामध्ये कार्यरत आहेत. केशवराव यांनी आपल्या हयातीत शरद पवारांनी आपले घर फोडल्याचा आरोप एका कार्यक्रमामध्ये केला होता; पण आता त्यांच्या पश्चातही त्यांच्या कुटुंबात पक्षांतराचे पर्व सुरूच आहे. प्रा.पुरुषोत्तम यांनी आदरणीय बाबांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणात दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे समाजमाध्यमांतून जाहीर केले. केशवरावांच्या हयातीत पुरुषोत्तम हे आरंभी शेकापमध्ये कार्यरत होते. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोबत धरला होता. गेल्यावर्षीच्या निवडणुकीत ते शेकापसाठी कार्यरत होते.