

हदगाव : वाढदिवसाचा आनंद साजरा करून घराकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा येथे बुधवारी (दि. २२) रात्री ९ वाजेच्या सुमारास कार-दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात माय-लेकासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना घेराव घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत भाऊराव नरवाडे (२३) हा आई रेखा नरवाडे आणि आत्या अनुसया हे तिघे बुधवारी रात्री वाढदिवस साजरा करून दुचाकीवर घरी येत होते. हडसणी फाट्यावर कारने (एमएच १२ केएन २५०९) यशवंत नरवाडे यांच्या दुचाकीला उडवून अन्य एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात पहिल्या दुचाकीवरील रेखाबाई भाऊराव नरवाडे (४२), मुलगा यशवंत भाऊराव नरवाडे (२३) आणि नणंद अनुसया चालाजी लोणाळे (४२) हे एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले.
तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन व्यक्तीही या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हदगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यात एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उशिरापर्यंत जखमी दोघांचीही नावे समजू शकली नाहीत. या भीषण अपघातामुळे संपूर्ण हडसणी परिसरात शोककळा पसरली असून, एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हडसणी फाटा सध्या अपघाताचे केंद्र बनला आहे. विशेष म्हणजे २१ एप्रिल रोजी याच ठिकाणी दोन अपघात झाले होते, तरीही प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी येथे गतिरोधक, रेडियम इंडिकेटर्स आणि हायमास्ट लाईट बसवण्यासाठी वारंवार निवेदने दिली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
सततच्या अपघातांमुळे हडसणी गावातील नागरिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. गुरुवारी (दि. २३) सकाळी संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी घेराव घातला. "जोपर्यंत रस्ता रुंदीकरण आणि ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही," असा पवित्रा नागरिकांनी घेतला. वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.