

नायगाव : नायगाव शहर व तालुक्यात दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला शिक्षणाधिकारी सलगर यांनी अचानक भेटी दिल्या. यामध्ये दोन परीक्षा केंद्रावर तीन विद्यार्थ्यांना रस्टिकेट करून एक प्रकारे कॉपी मुक्तीच्या घोषणेला सुरुंग लावणाऱ्या शाळेला धक्का दिला आहे.
नायगाव शहरातील श्री दत्त माध्यमिक विद्यालय नायगाव या परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्याने, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर विद्यालय धुप्पा येथे एक विद्यार्थी नकला करताना आढळल्याने त्याच्यावर रस्टिकेटची कार्यवाही करण्यात आली.
नायगाव परीरक्षा केंद्र अंतर्गत दहावीच्या १४ परीक्षा केंद्रांवर पहिल्या मराठीच्या पेपरला ३ हजार ७२७ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६५३ विद्यार्थी उपस्थित होते. इंग्रजीच्या पेपरला ७४ विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. अशी माहिती तालुक्याचे परीरक्षक आनंत रेणगुंटवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून तालुक्यातील धुपा,बरबडा, नायगाव , घुंगराळा, मरवाळी तांडा, कुंटूर, हाळदा,शंकर नगर, कोलंबी, कुंटूर तांडा, नरसी आदी भागात ठिकाणच्या १४ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. इंग्रजी च्या पेपरला तालुक्यात परीक्षा केंद्रांना शिक्षणाधिकारी सलगर , गट विकास अधिकारी एल आर वाजे गट शिक्षणाधिकारी संग्राम कांबळे आदींनी भेटी दिल्या.
नायगाव शहरातील एका नामांकित शाळेतील परीक्षा केंद्राच्या बाहेरून पत्र्यावर चढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाची चित्रफित, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाल्याने आगोदरच काळ्या यादीत आलेल्या या परीक्षा केंद्राची बदनामी शहरातून होत आहे.