MLC Election : वि. प. निवडणुकीसाठी नांदेड भाजपामध्ये तिघांची नावे चर्चेत!

माजी आमदार राजुरकर आघाडीवर; कौडगे व देशमुख यांचेही प्रयत्न सुरू
MLC Election
MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना सोमवारी जारी झाल्यानंतर या निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रथमच अव्वल आणि सक्षम झालेल्या भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार, याची चर्चा येथे सुरू झाली. त्यात अमर राजूरकर यांच्यासह भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांतील संजय कौडगे आणि चैतन्य देशमुख यांच्या नावांची जोरकसपणे शिफारस झाली आहे.

अमरनाथ राजूरकर हे भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष तसेच पक्षनेते खा.अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती आहेत. त्यांनी वरील मतदारसंघाचे काँग्रेसतर्फे तब्बल 12 वर्षे प्रतिनिधित्व केले. 2022 साली त्यांची मुदत संपल्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांनीही भाजपात प्रवेश केला आणि नंतर नांदेडच्या पक्षसंघटनेतील अध्यक्षपद मिळविले.

MLC Election
West Bengal Election 2026 | अस्मितेची कसोटी

मागील अनुभवाच्या जोरावर ते भाजपाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कौडगे व देशमुख यांनी पक्षात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. सध्या हे दोघेही प्रदेश उपाध्यक्ष असून नांदेडमधील अनेक हितचिंतकांनी त्यांच्या नावाचा ‌‘फुलोरा‌’ समाजमाध्यमांतून पसरवला असल्याचे दिसून आले.

या निवडणुकीसाठी वरील तिघांतून कोणाला उमेदवारी दिली जाईल, याची चाचपणी समाजमाध्यमांतून सुरू झाल्यानंतर राजूरकर यांचे नाव आघाडीवर असतानाही कौडगे व देशमुख यांचीही नावे अनेक हितचिंतकांनी पुढे केल्याचे दिसून आले. अत्यंत कठीण राजकीय काळात नांदेड जिल्ह्यात ज्यांनी भाजपा रुजवला त्यांतील बहुसंख्य कार्यकर्ते एक तर हयात नाहीत किंवा हयात असलेले वयोमानानुसार थकलेले आहेत.

नंतरच्या पिढीतील प्रतिनिधी म्हणून कौडगे आणि देशमुख यांची नावे पुढे करण्यात आली आहेत. काहींनी अशोक चव्हाण जे नाव पुढे करतील, त्यालाच उमेदवारी मिळेल असा अंदाज वर्तविला आहे. समाजमाध्यमांतील चर्चेचा सूर मात्र भाजपाच्या खऱ्याखुऱ्या कार्यकर्त्यास न्याय मिळाला पाहिजे, असा निघत आहे.

MLC Election
Nanded Waghala Municipal Election Results : नांदेड मनपामध्ये भाजपाचे ‌‘अशोक पर्व!‌’

वरील मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून त्यावर आधीच्या काळात शंकरराव चव्हाण आणि नंतरच्या काळात अशोक चव्हाण यांनी आपला प्रभाव राखत काँग्रेसतर्फे त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडून आणला. राजूरकर यांच्या आधी कमलकिशोर कदम आणि किशन राठोड यांनी या मतदारसंघात सलग दोनदा प्रतिनिधित्व केले होते.

2010 साली भाजपावर माघारीची नामुष्की ओढवली होती, तर 2016 साली या पक्षाने माजी सनदी अधिकाऱ्यास उभे केले; पण हा प्रयोगही अयशस्वी ठरला होता. संख्याबळात हा पक्ष आता अव्वल झाल्यामुळे निष्ठावंतांच्या अपेक्षा उंचावल्या असल्या, तरी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या नावांची चर्चा असली, तरी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे राजूरकर यांना संधी देतील, कारण भाजपात प्रवेश करण्याआधीपासून फडणवीस यांच्याशी राजूरकर यांचे चांगले संबंध होते. याकडे भाजपाच्या एका माजी जिल्हाध्यक्षांनी लक्ष वेधले.

पक्षबाह्य व्होट बँक राजूरकरांच्या मागे!

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 जून आहे. तत्पूर्वी भाजपाच्या उमेदवाराचे नाव याच आठवड्यात नक्की केले जाणार असून राजूरकर आणि कौडगे यांनी उमेदवारीसाठी स्वतंत्रपणे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले. तर चैतन्य देशमुख यांनीही भाजपा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून उमेदवारीची मागणी केली. एकूण मतदारांमध्ये भाजपा नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असली, तरी मराठवाडा जनहित पार्टी (मजपा) आणि एमआयएम यांच्या सुमारे 50 मतांसह काँग्रेसचेही काही मतदार अशी मोठी ‌‘व्होट बँक‌’ राजूरकर यांच्या मागे असल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news