नांदेडमध्ये 'ऑनलाईन' धूम; किराणासुद्धा घरपोच मागविण्याचा 'ट्रेंड'

नांदेडमध्ये 'ऑनलाईन' धूम; किराणासुद्धा घरपोच मागविण्याचा 'ट्रेंड'
nanded news
नांदेडमध्ये 'ऑनलाईन' धूम; किराणासुद्धा घरपोच मागविण्याचा 'ट्रेंड'pudhari photo
Published on
Updated on

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दसरा, दिवाळीच्या खरेदीने बाजारात धूम माजवली आहे. त्यातल्या त्यात ऑनलाईन उलाढाल कोर्टीच्या कोटी उड्डाणे घेत असून दिवसाकाठी साधारण ५ करोड रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंबरोबरच मोबाइल, तयार कपडे, पादत्राणे, मोजे याशिवाय आता किराणासुद्धा ऑनलाईन मागवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्या तुलनेत तयार बांधकामांचे दिवस फिरले असून शहरालगतच्या ग्रामीण भागात प्लॉट्सना अच्छे दिन आहेत.

भारतातले सर्वात मोठे सण म्हणजे दसरा आणि दिवाळीचा पाडवा. हे दोन्ही पूर्ण मुहूर्त आहेत. या दिवसांत विविध महागड्या वस्तुंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. मागील दीड दशकापासून स्थानिक बाजारावर ऑनलाईनची संक्रांत आली असून मागील आठ दिवसांपासून ऑनलाईन मार्केटिंगमध्ये एकाहून एक आकर्षक योजना जाहीर केल्या गेल्या आहेत. अँमेझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट, टाटा ग्रोसरी, टाटा संपन्न या व अशा कितीतरी ऑनलाईन मार्केटिंगमध्ये गर्दी मावत नाही. काल-परवापर्यंत किराणा सामानाची खरेदी ऑफलाईन पद्धतीनेच होत होती. माहवारी खातेदार वगळता नगदी खरेदी करणारे सुपर मार्केटमध्ये जाऊन एकावर एक फ्री यासारख्या योजनांचा लाभ घेत असत.

आजही डीमार्टसारख्या सुपर मार्केटमध्ये दिवाळीसाठी लाखोंची उलाढाल होते. पण, आता किराणा सामानसुद्धा घरपोच ऑनलाईन पद्धतीने मागविण्याची प्रथा रुढ झाली आहे. डिटर्जंटसारख्या वस्तू ऑनलाईनवर खूप कमी किमतीत मिळतात, असा ग्राहकांचा दावा आहे. फ्रीज, एसी, महागडे पंखे, कूलर, मोबाइल फोन, पेन ड्राईव्ह, वायरलेस की बोर्ड, माऊस अशा वस्तू ऑनलाईन मागविल्या जातात. तर कपडे, साड्या, स्वेटर, मोजे, पादत्राणेदेखील याच पद्धतीने घरपोच मागविले जात आहेत. ड्रायफ्रूटस, प्लास्टिकच्या वस्तू, दिवे, आकाशकंदील, लाईटिंग व सुशोभीकरणाच्या अन्य वस्तूदेखील ऑनलाईन मागविल्या जात आहेत. रियल इस्टेटमध्ये तयार बांधकामे किंवा फ्लॅट्सना तुलनेने मागणी कमी आहे. त्यामुळे दसरा तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन स्कीम जाहीर होण्याचे प्रमाण नगण्य असेल, असे जाणकारांचे मत आहे.

कारण महापालिका हद्दीत नवीन बांधकामांना परवानगी मिळत नाही. परंतु शहरालगत ग्रामीण भागात प्लॉट खरेदीकडे लोकांचा अधिक कल आहे. मालेगाव रोडवर कासारखेडा पर्यंत पूर्णा रोडवर पोखर्णी, लातूर रोडवर मुसलमान वाडी, डेरला, जानापुरीपर्यंत, बाभुळगाव, काकांडी या भागात प्लॉटिंगच्या अनेक स्कीम उपलब्ध आहेत. याप्रमाणे वाहन खरेदीकडेही लोकांचा भरपूर कल दिसून येतो. इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये चेतक, आयक्युब, अथर या ब्रँडेड गाड्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. चारचाकी वाहनांनाही भरपूर मागणी दिसून येते. अलीकडेच रेंज रोव्हर या बँडने आपले नवे मॉडेल सादर केले. प्रत्यक्ष उलाढाल मात्र दसऱ्यानंतर कळू शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news