नायगाव : नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील रुई पासून जवळच असलेल्या इज्जत गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गायरान पट्ट्यातून विद्युत लाईन गेलेली आहे. या ठिकाणी लाईटच्या खांबाखाली विद्युत प्रवाह उतरल्यामुळे लाव्हारस सदृश अग्नि १६ मार्च दिवशी नागरिकांना दिसून आला. या ठिकाणी सदरच्या अग्नीतून जळून गेलेले दगड जमिनीतून बाहेर आल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.
नायगावच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांच्याकडे संपर्क केला असता या प्रकरणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कुरे यांच्याकडून माहिती घेतली असून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना या पूर्वी घडल्या आहेत असे सांगण्यात आले आहे. हा लाव्हा, ज्वालामुखी प्रकार नसून सखोल माहिती घेऊनच बातमी घ्यावी. अफवा पसरवू नये असे प्रशासनाने सांगितले आहे.

