

नांदेड : सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे. मागील पंधरा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये रोज दोन हजार गोण्या (कट्टे) विक्रीसाठी येत आहे. मात्र, शासनाच्या हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमट आहे.
जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना तर सोयाबीनची कापणीच करावी लागली नाही. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी केली, त्यांना सरासरी प्रति एकर दोन ते अडीच क्विंटल सोयाबीन होत आहेत. त्यातही खासगी बाजारात मातीमोल भाव मिळत आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना मशागत खर्चही वसूल होण्याची शक्यता नाही. अशावेळी शासनाकडून किमान शासकीय खरेदी केंद्र सुरू करून हमीभाव शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते. परंतु शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाही
दिवाळी झाली आहे, तरीही नाफेड मार्फत शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाही. या खरेदीला कधी सुरुवात होणार यासंदर्भात पण, कोणत्याही सूचना अद्याप यंत्रणेला मिळालेल्या नाहीत. हे खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर खाजगीतील दरातही फरक पडेल, असे सांगितले जात आहे.
सोयाबीन उत्पादनात झाली घट
अतिवृष्टी व रोगाने आक्रमण केल्यामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे. याचा फटका जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना बसला आहे. काही शेतकऱ्यांना सरासरी एकरी २ ते अडीच क्विंटल इतके उत्पादन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी सोयाबीनचे उत्पादन घेण्यासाठी लावलेला खर्च सुध्दा निघाला नाही. दिवाळीसाठी पैशाची गरज असते. लेकीबाळींना घरी आणायचे असते. त्यामुळे शेतकरी आहे त्या भावात सोयाबीनची विक्री करत आहेत, असे मुदखेड तालुक्यातील बारड येथील शेतकरी बालाजी उपवार यांनी सांगितले.