

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्त रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले असून, ऑक्टोबरमध्ये ६७ तर नोव्हेंबरमध्ये ७१ गाड्यांचा त्यात समावेश आहे. शिवाय रेल्वे स्थानकावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफही सज्ज झालेला आहे.
दिवाळी सण छच पुजेदरम्यान रेल्वे प्रवाशांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन, नांदेड विभाग आणि दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वे चालविण्यासोबतच अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात ६७ तर नोव्हेंबर महिन्यात ७१ विशेष रेल्वे चालवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांचा परतीचा प्रवास सुकर होणार आहे. सध्या नियमित धावणाऱ्या तसेच विशेष रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात आलेले असून, प्रतीक्षा यादीतील प्रवासी त्यांच्या नियोजितस्थळी आरामात पोहचू शकणार आहे.
सुरळीत तिकीट काढण्यासाठी, मागणीवर आधारित काउंटरची संख्या वाढवण्याच्या योजनांसह, प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त काउंटरसह सामान्य तिकीट ऑपरेशनला बळकटी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, एससीआर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (ठाक्र) आणि स्थानकांवर तिकीट तपासणी कर्मचारीही तैनात करण्यात आलेले आहे.
नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, हिंगोली, वाशिम आणि पूर्णा इत्यादी सर्व प्रमुख स्थानकांवर विभागातील अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रेल्वेच्या सर्व आरक्षित डब्यांवर देखरेख ठेवण्यासोबतच विनातिकीट प्रवास टाळण्यासाठी विशेष तिकिट तपासणी पथकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.