नांदेड, पुढारी वृत्तसेवा: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती कार्यक्रम राबविण्याच्या सूचना आहेत. तथापि नांदेड जिल्ह्यात या योजनेची गार्भियाने अंमलबजावणी होत नाही. हे लक्षात येताच शिक्षण विभागाने लेखी आदेश जारी करत महिन्यातील कोणत्याही दोन बुधवारी अंडी पुलाव देण्याचे निर्देश दिले आहेत. आता शिक्षकांत 'अंडे पुराण' रंगले आहे.
शालेय पोषण आहार किंवा माध्यान्ह भोजन योजना सुरू झाल्यापासूनच साधक बाधक चर्चेच्या तसेच विडंबनाच्या कचाट्यात सापडली आहे. वारंवार तसेच काळानुरुप त्यात बदलही होत गेले. आता राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला ताजे आदेश दिले आहेत.
त्यानुसार प्रत्येक महिन्यातील दोन बुधवारी 'अंडा पुलाव' स्वरुपात पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्या विद्यार्थ्यांना अंडी चालत नाहीत, किंवा जे विद्यार्थी अंडी खाणार नाही, अशा विद्यार्थ्यांना निर्धारित करण्यात आलेल्या दराच्या किंमतीत केळी अथवा अन्य फळे देण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, अर्धा ऑगस्ट संपला,
सप्टेंबर महिन्याचेही २१ दिवस संपले तरी आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नाराज झाल्या आणि त्यांनी उर्वरित सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे वेळापत्रकच आखून दिले आहे. त्यानुसार गेल्या बुधवारी दि. २५ रोजी अंडी पुलाव वाटप झाला असून त्यावर आता शिक्षकांच्या ग्रुपवर अंडा पुराण सुरू झाले आहे.
संबंधित गुरुजी आलेल्या अनुभवावरुन चर्वितचर्वण करीत असल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अंडी पुलाव दिल्यानंतर गुरुजींनी बुरजीवर ताव मारल्याची चर्चा खबरे करीत आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना अंडी पुलाव दिला असे सांगावांगी जमणार नाही तर बाजप्ता संबंधित शाळेने जिओ टॅग मधील फोटो नमूद तारखेसह जिल्हास्तरावरील पुरक आहार (अंडी / केळी) पीएम पोषण नांदेड असे आहे. शिक्षण विस्तार अधिकारी किंवा केंद्र प्रमुखाच्या माध्यमातून या ग्रुपवर पुरावे टाकणे बंधनकारक आहे. शिवाय अंडी खरेदी बिले, स्टॉक नोंदवही, वाटप नोंद वही, असा सर्व सोपस्कार सांभाळावे लागणार आहेत.