

Seeds were not available due to MahaDBT's mistake!
तामसा, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील हजारो शेतकरी बांधव सध्या महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे महामंडळाकडून मिळणाऱ्या अनुदानित बियाण्यांपासून वंचित आहेत. खरीपाच्या पेरणीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी महाडीबीटी फ ार्मर पोर्टलवर बियाण्यासाठी अर्ज केले होते. पेरणीनंतर महिनाभराने अनेक शेतकऱ्यांना बियाणे अर्ज लॉटरीत अर्ज विनर झाल्याचा मॅसेज आला. मात्र प्रत्यक्षात कृषी विभागाकडे आलेल्या यादीत हजारो शेतकऱ्यांचे नावेच नसल्याचे दिसून आले आहे.
खरीप हंगाम सुरु होऊन बरेच दिवस उलटले, बियाणांची आवश्यकता वाढली असतानाच हा अडथळा निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने तालुक्यांत फक्त १८१ शेतकऱ्याची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, मग बाकीच्या शेतकऱ्यांना या शासनाच्या महत्वकांशी योजनेपसून वंचित राहण्याची वेळ आली आहे. कृषि विभागाकडून हात वर करण्यात आले आहेत. कारण ही प्रक्रिया पूर्णपणे ऑन लाईन पोर्टलवर सूरू असल्याने आमच्या हातात काहीही नाही अशी त्यांची भूमिका आहे. मग यादीत नाव नसल्यामुळे बियाणे देता येणार नाही पण उपलब्ध असलेल्या बियाण्याला ठेऊन काय करणार? अशी कुजबुज शेतकरी बांधवात सुरू होती.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज पूर्ण झाल्यानंतरही वितरण केंद्रावर बियाणे मिळत नाहीत. काही ठिकाणी तर पोर्टलवर बियाण्यांचा साठा दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात ते उपलब्ध नाहीत. तसेच अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्षात या बाबत चा कृषी विभागाकडून संदेश प्राप्त झाला पण दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या यादीत नाव नसल्यामुळे बियाणे देता येत नाही मग तालुक्यांत शेतकऱ्यांना संदेश पाठवून शेतकऱ्याची एक प्रकारे शासनाकडून थट्टा सुरू आहे की काय? असा संतप्त सवाल शेतकरी करु लागले आहेत. काही शेतकऱ्यांनी म्हटले की, वेळेत बियाणे न मिळाल्यास पेरणी उशिरा होईल आणि उत्पादनावर परिणाम होईल. आम्हाला प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते. सरकारने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा खरीप हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.
तालुका कृषी अधिकारी म्हणाले, 'पोर्टलवर तांत्रिक त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांना बियाणे मिळतील'. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की, मग पेरणी करावी कधी? तामसा येथील बजरंग कृषी सेवा केंद्र आणि जांभळेकर कृषी सेवा केंद्र येथे जवळपास वरवट, मनाठा, चोरंबा, येथील शेतकरी बियाणे नेण्यासाठी आले होते परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करत रिकाम्या हाताने जावे लागले.