

किनवट, पुढारी वृत्तसेवा अस्मानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना अजूनही ताज्या असताना राज्य सरकारने केवळ ८५ रुपये प्रति गुंठा नुकसानभरपाई जाहीर केली आहे. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे, अशी तीव्र टीका किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अर्जुन आडे यांनी केली.
गत ऑगस्ट महिन्यात विविध मंडळात झालेल्या अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ६ लाख ४८ हजार हेक्टर खरीप शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्याच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ५५३ कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले असले, तरी वास्तविक नुकसानीच्या तुलनेत ही मदत अत्यंत तुटपुंजे असल्याचे किसान सभेचे मत आहे.
किसान सभेच्या नांदेड केली आहे की, शासनाने जिल्हा कमिटीने मागणी शेतकऱ्यांचा विचार सहानुभूतीपूर्वक करून भरीव निधीची तरतूद करावी अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
किसान सभेने केलेल्या मागण्यांमध्ये अतिवृष्टीने शेतीपिके नष्ट झाल्यामुळे शेतमजुरांचाही रोजगार हिरावल्या गेला आहे, म्हणून त्यांचाही अतिवृष्टीबाधितांमध्ये समावेश करून शासकीय मदत देण्यात यावी. पीकविमा योजनेअंतर्गत तातडीने शेतकऱ्यांना विमा अनुदान द्यावे. तसेच नदी-नाल्यालगत खरडून गेलेल्या शेती जमिनींची सरकारमार्फत दुरुस्ती करून देण्यात यावी.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला संकटाच्या काळात सरकारकडून खरी आधाराची गरज आहे. जर शासनाने भरीव नुकसानभरपाई जाहीर केली नाही, तर शेतकऱ्यांचा आक्रोश आगामी दिवसात रस्त्यावर उतरलेला दिसेल, असेही अर्जुन आडे यांनी स्पष्ट केले आहे.