

माहूर (नांदेड) : दरवर्षीप्रमाणे यंदाही माहूर येथे पारंपरिक परिक्रमा यात्रा उत्साहात पार पडली. मात्र, यात्रेदरम्यान भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे तालुक्यातील गुंडवळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पीडित शेतकरी ज्ञानेश्वर बंडू राठोड यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार देत तातडीने पंचनाम्यासह नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यांच्या शेतकरी राठोड म्हणण्यानुसार, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी झालेल्या माहूर परिक्रमा यात्रेदरम्यान हजारोंच्या संख्येने भाविक मार्गस्थ झाले. या भाविकांनी त्यांच्या मालकीच्या गट क्र. ६९ मधील कापूस व तूर पिक असलेल्या सुमारे १ एकर शेतावरून तुडवत मार्ग काढला.
त्यामुळे पिकांचे गंभीर नुकसान होऊन कुटुंबाच्या उपजीविकेवर संकट ओढावले आहे. या घटनेनंतर राठोड यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून नुकसानीची तातडीने पाहणी व पंचनामा करण्याची, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार माहूर, आमदार भीमराव केराम तसेच तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.
स्थानिक शेतकरी व नागरिकांनी यात्रेदरम्यान शेतजमिनींचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक सक्षम नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच, पीडित शेतकऱ्याला त्वरीत न्याय देऊन झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.