

Nanded Collector Office Protest
नांदेड : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, तसेच दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी डावे, लोकशाहीवादी व पुरोगामी समविचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर न्याय आणि हक्कासाठी शांततामय मार्गाने संसद भवनाकडे मोर्चा काढणाऱ्या युवक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दिल्ली पोलिसांनी अमानुष कारवाई केल्याचा आरोप आहे. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याचाही आरोप करण्यात आला असून, या कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. विद्यार्थ्यांवरील अशा प्रकारच्या कारवाईचा तीव्र निषेधही निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या नीटसारख्या स्पर्धा परीक्षांचे पेपर भविष्यात फुटणार नाहीत, यासाठी केंद्र सरकारने प्रभावी आणि कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच नीट पेपरफुटी प्रकरणातील जबाबदार घटक, राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आणि अन्य दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रदीप नागापूरकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. विजय गाभणे, प्रा. गौतम दुथडे, कॉ. उज्वला पडलवार, एमपीजेचे अल्ताफ अहमद, कॉ. बी. के. पांचाळ, कॉ. दिगंबर घायाळे, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ. विनोद गोविंदवार, कॉ. लता गायकवाड, गणेश संधुपटला, प्रा. आदिनाथ इंगोले, साहेबराव पुंडगे, श्याम सरोदे, जय गायकवाड, सुनील अनंतवार, देवराव अर्मतवार, मंगेश वट्टेवार, दत्ता जोगदंड, अशोक वाघमारे, राहुल नरवाडे, शीला शिंदे, शिवाजी रंगे, हनुमंत मोरे, मंगल जोनापल्ले, वनिता जोगदंड, अरुणा जोगदंड, कविता भिसे, क्षमा वाघमारे, गयाबाई जोगदंड, साहेबराव वाघमारे, मेघाजी गायकवाड, वर्षा कांबळे, मेघा इंगोले, मंगेश देव कांबळे, भगवान नाईक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.