

Principal absent in 'People's' in sudden visit of Vice-Chancellor!
विशेष प्रतिनिधी
नांदेड : शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ ते नरहर कुरुंदकर अशा थोरांची परंपरा सांगणाऱ्या शहरातील पीपल्स कॉलेजला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पथकाने बुधवारी सकाळी आकस्मिक भेट दिली असता, प्राचार्यांसह अनेक प्राध्यापक महाविद्यालयात हजर नसल्याचे आढळले. या भेटीमुळे संबंधितांत एकच खळबळ उडाली.
वरील महाविद्यालयात अलीकडेच 'नांएसो'च्या एका पदाधिकाऱ्याने उच्चशिक्षण विभागाच्या सहसंचालकांशी अत्यंत असभ्य वर्तन केले. एका प्राध्यापकाला शिवीगाळ केली, पण नंतर इतर पदाधिकाऱ्यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला होता. वेगवेगळ्या विषयांतील दिगंत कीर्तीचे प्राचार्य, प्राध्यापक लाभलेल्या या महाविद्यालयाचा जुना लौकिक मागील काही वर्षांत मात्र लुप्त झाला आहे.
या पार्श्वभूमीवर 'स्वाराती' मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू अशोक महाजन आणि विद्यापीठातील प्रभारी अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे यांनी बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पीपल्स कॉलेजला अचानक भेट दिली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पंधरवडा झाला आहे. सर्व महाविद्यालये वेळापत्रकानुसार चालतात का, प्राचार्य आणि प्राध्यापकवृंद महाविद्यालयात उपस्थित आहेत का, विद्यार्थी वर्गामध्ये येतात का, याची तपासणी करण्याची मोहीम या महाविद्यालयापासूनच सुरू करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी शेजारच्याच सायन्स कॉलेजमध्ये जाऊन पाहणी केली.
कुलगुरूंच्या महाविद्यालय भेटीची सविस्तर माहिती समोर आली नाही, पण प्र कुलगुरू डॉ. महाजन पीपल्स कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांच्यासह उपस्थित नसल्याचे दिसून आले. या पथकाने प्राध्यापकांचे हजेरी पुस्तिका तपासली. वेगवेगळ्या विभागांना भेट दिली. काही वर्गामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता बहुसंख्य वर्गामध्ये विद्यार्थी हजर नसल्याचे दिसून आले. हे पथक आल्याची माहिती मिळताच प्राचार्य घाईघाईने महाविद्यालयामध्ये दाखल झाले. नंतर इतर अनेक प्राध्यापकही महाविद्यालयात उपस्थित झाल्याचे दिसून आले. प्र कुलगुरूंनी महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य शाखांच्या वेगवेगळ्या विषयांचे वेळापत्रक हस्तगत केले. त्यानुसार वर्ग सुरू आहेत का, याची खातरजमा केली.