

Umarkhed Police Attack Case
उमरखेड : छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीच्या उपोषण मंडप हटविण्याच्या कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना 31 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता सारडा पेट्रोल पंपासमोर घडली. शासनाच्या आदेशानुसार पोलिसांनी मंडप हटविण्यास सुरुवात केली असता उपोषणकर्त्यांनी विरोध केला. यावेळी उपस्थित रमेश चव्हाण, राहुल मोहीतवार, गुलाबराव सूर्यवंशी, प्रविण देशपांडे यांनी पोलिसांना धमक्या देत "मंडप हटविल्यास शहर पेटवू" असे वक्तव्य केले.
यानंतर एका कारमधून आलेले गजानन देशमुख, गोपाल झाडे, अभय पवार यांनी पोलिसांशी शिवीगाळ करून अडथळा निर्माण केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता प्रियदर्शन देशमुख (वय 17) या तरुणाने पोलीस हवालदार गजानन पोले यांच्या नाकावर बुक्की मारून दुखापत केली.
या प्रकरणी रमेश चव्हाण, राहुल मोहीतवार, गुलाबराव सूर्यवंशी, प्रविण देशपांडे, गजानन देशमुख, गोपाल झाडे, अभय पवार आणि प्रियदर्शन देशमुख या आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे हे करीत आहेत.