

Pitch-black skies and three minutes of rain
विठ्ठल फुलारी
भोकर : एल निनो आणि बंगालच्या उपसागरात बदलत चाललेली परिस्थिती पाहता ऐन पावसाळ्यात राज्याचं टेन्शन वाढल्याचे चित्र दिसत आहे. मागील पंधरा दिवसात कधीतरी काळाकुट्ट आभाळ येते आणि आता मोठा पाऊस होईल असे वाटत असतानाच केवळ तीन मिनिटे पाऊस होतो आणि पुन्हा आभाळ शुभ्र होत असल्याचा अनुभव येत असताना भविष्यात पाण्याची कमतरता भासेल असे संकेत मिळत आहेत. ग्रीड योजनेचा नळ यावर्षी हि चालू होणार नसल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे.
मागील अनेक वर्षापासून भोकर तालुक्याच्या नशिबी पाणी टंचाई पाचवीला पुजली आहे. तालुक्यातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवा यासाठी जलजीवन योजनेच्या माध्यमातून घर तिथे नळ कनेक्शन देण्याची कामाला सुरुवात झाली असताना यास ग्रीड योजनेची साथ मिळाली. एका माणसाला दरदिवशी ५५ लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.
प्रत्येक गावाला ग्रीड योजनेतून पाणी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गोड स्वप्न मागील पाच वर्षापूर्वी दाखविले गेले. पण हि योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यासाठी विलंब केला जात आहे. निधी रखडला गेला असल्यानेच सध्या हि योजना व्हेंटिलेटर वर आहे. सदरील योजनेचा निधी रखडला असल्याने संबंधित गुत्तेदार पुढचे काम करायला तयार होत नसल्याचे चित्र दिसत आहे. ग्रीड योजनेचा शुद्ध पाणी यावर्षीच्या उन्हाळ्यात मिळत नाही हे सत्य आहे. एल निनो आणि बंगालच्या उपसागरात बदलत चाललेली परिस्थिती पाहता ऐन पावसाळ्यात राज्याचं टेन्शन वाढल्याचे चित्र दिसत आहे.
मागील पंधरा दिवसात कधीतरी काळाकुट्ट आभाळ येते आणि आता मोठा पाऊस होईल असे वाटत असतानाच केवळ तीन मिनिटे पाऊस होतो आणि पुन्हा आभाळ शुभ्र होत असल्याचा अनुभव येत असताना भविष्यात पाण्याची कमतरता भासेल असे संकेत मिळत आहेत. यासाठी यावर्षी पाणी जपून वापरावे लागणार आहे. नाही तर येणारा उन्हाळा सर्वसामान्य नागरिकांना वेदनादायक ठरणार आहे.
मोठा पाऊस नाही झाला तर....
एल निनो मुळे परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली नाही तर खूप अवघड आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती निर्माण होणार आहे. यासाठी प्रशासन आता पासून सज्ज झाले असले तरी नेमकं पाणी आणायचं कुठून हा प्रश्न गंभीर आहे. पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्यातून, गोदावरी नदीवरून पाणी आणावे लागणार आहे. आता पासून तयारी करावी लागणार असून याला राजकीय पाठबळ आवश्यक आहे.
पाण्याच्या बचतीची लोकचळवळ व्हावी...
पाणी वाचवण्याची ही चळवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता ती एक सामाजिक चळवळ बनायला हवी. तरच भविष्यात पाण्याचे नियोजन, वापर, काटकसर याबाबत एक सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होईल. आणि काही प्रमाणात उपलब्ध पाण्यातून पाणी टंचाई वर मात केली जाईल. जर पाण्याची बचत करण्यासाठी लोकचळवळ झाली तर कमी पाऊस होवून हि पाणी टंचाई वर मात करता येईल.
शोषखड्डे व रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज...
मागील काही वर्षापासून छतावरचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. सरपंचांनी शोषखड्डयाकडे दुर्लक्ष करत नाली बांधकाम वर जोर दिला. यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. यामुळे प्रशासनाने या बाबत कडक भूमिका घेत रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मोहीम सुरू करून ती गतीमान करावी. आणि शहरी व ग्रामीण भागात शोषखड्डे उभारण्यासाठी प्राधान्य द्यावे लागेल.
प्रश्न केवळ कमी पावसाचा नाही...
प्रश्न केवळ कमी पावसाचा नाही. पाणी साठविण्याची, जिरविण्याची आणि पुनर्वापराची यंत्रणा किती प्रभावी आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे. अद्याप पर्यंत भोकर तालुक्यातील प्रशासनाने, राजकीय मंडळीने, शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी याचा विचार केला नाही. पावसाचा ताळेबंद अजून ही तयार नाही. कमी पाऊस झाला तर पिकपाण्याचे, पाणी वापराचे नियोजन केले तर पाणी टंचाई ला काही प्रमाणात आळा बसेल.