

नांदेड : काँग्रेस हा क्रांतिकारी विचारांचा राष्ट्रीय पक्ष आहे, सर्वधर्मसमभाव जोपासणारा पक्ष असून भाजपा आणि काँग्रेसमध्ये मोठे वैचारिक अंतर आहे. चांगला विचार घेऊन पुढे जाणारा पक्ष असल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकशाही आणि विचारांवर विश्वास नसलेल्या भाजपाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देगलूर तालुक्यातील जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देगलूर येथील जाहीरसभेत व्यक्त केला.
मंगळवारी (दि.28) दुपारी मोंढा मैदान देगलूर येथे झालेल्या काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. व्यासपीठावर खा. रवींद्र वसंतराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, अब्दुल सत्तार, रामदास पाटील सुमठाणकर, मोगलाजी शिरशेटवार, मनोरमा मष्णाजी निलमवार आदींची उपस्थिती होती.
प्रदेशाधक्ष सपकाळ यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टिका करताना, अनेक लाडक्या बहिणींचे पैसे बंद केल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप झाली नाही. मोदी सरकारने इंदिरा आवास योजनेचे नाव बदलून पंतप्रधान आवास योजना अंमलात आणली खरी, परंतु लाभार्थ्यांचे धनादेश बँकेत वटले नाहीत. सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे. या सरकारला आता घरघर लागली असल्याचे सपकाळ म्हणाले.
ही लढाई विचारांची लढाई आहे आणि आपण ती हरलो तर पुढील सात पिढ्यया आपल्याला माफ करणार नाही. राहुल गांधी यांच्या विचारांवर जनतेचा विश्वास वाढत आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपा नेत्यांना व त्यांच्या मंत्र्यांना या भागातील जनता पळता भूई थोडी करतील, असाही विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला. स्पृश्य आणि अस्पृश्य मानणारा, म. गांधींच्या खूनानंतर साखर वाटणारा भाजपा हा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारा पक्ष असल्याची जोरदार टिका सपकाळ यांनी केली.
सर्व जागा काँग्रेस जिंकणार - खा. रवींद्र चव्हाण
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देगलूर तालुक्यातील सर्व जागांवर काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध होईल, संपूर्ण ताकदीनिशी काँग्रेस या निवडणुकीत उतरणार असून सर्वांना न्याय मिळेल, असे आश्वासन खा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी दिले. यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मनोरमा मष्णाजी निलमवार यांना खा. रवींद्र चव्हाण यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली.