श्रीक्षेत्र माहुर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पापलवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंचाने संगनमत करून काम न करताच, ती केल्याचे दप्तरी दर्शवून लाखों रुपये हडपले. असा गंभीर आर- ोप भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड, उपसरपंच रविना राठोड व अन्य सदस्यांनी दि.१८ सप्टें. रोजी गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांना दिलेल्या तक्रारीतून केला. त्यानुषंगाने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी यांना दि.११ ऑक्टों. रोजी दिले आहेत. त्यामुळे ग्रामसेवक व सरपंचाचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
अंगणवाडी करीता पेवर ब्लॉक बसविणे, वॉटर फिल्टर बसविणे, बंदिस्त नाली बांधकाम करणे, पाणी पुरवठा योजनेसाठी पाईप लाईन टाकणे, पाणी पुरवठा स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, मागासवर्गीय कल्याण व इतर उपक्रमातील कामे न करताच ती केल्याची दप्तरी नोंदवून मोठ्या प्रमाणात अनियमितता करून लाखों रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड, उपसरपंच रविना राठोड, प्रियंका चव्हाण, पूनीबाई राठोड व अरविंद राठोड या सदस्यांनी गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांना दिलेल्या तक्रारीतून केला होता.
त्यानुसार गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी दि.११ रोजी दिलेल्या आदेशात प्रत्यक्षस्थळी जाऊन सखोल चौकशी करून ७ दिवसांच्या आत वस्तुनिष्ठ अहवाल कार्यालयात सादर करण्याचे फर्मान सोडले आहे. याकामी दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी ताकीद सुद्धा त्यात दिली आहे.
कालच चौकशी करण्या संदर्भातले आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार लवकरच चौकशी केली जाईल.
एल. पी. जाधव विस्तार अधिकारी (सा)