

Naigaon storm crop damage
नायगाव : तालुक्यात सोमवारी (दि.२३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या जोरदार सरींमुळे काढणीला आलेली ज्वारी, मका, गहू आणि हरभरा ही पिके जमिनीदोस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने तालुक्यातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नायगाव, नरसी, मांजरम, बरबडा आणि कुंटूर भागात ढगाळ वातावरण होते. सोमवारी सायंकाळी अचानक सुटलेल्या वेगवान वाऱ्यामुळे उभी असलेली ज्वारीची पिके कोलमडून पडली. अनेक ठिकाणी कणसे तुटून चिखलात पडल्याने पिकांची गुणवत्ता खालावली आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असतानाच पिके आडवी झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
केवळ ज्वारीच नव्हे, तर मका, हरभरा आणि गहू या पिकांवरही ओलाव्यामुळे परिणाम झाला आहे. दाण्यांचा रंग बदलणे आणि गुणवत्ता खराब होण्याच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि आता अवकाळीचा दुहेरी मार, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या असून वीजपुरवठाही खंडित झाला होता. या नैसर्गिक आपत्तीनंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाचे आणि चिंतेचे वातावरण आहे.
"निसर्गाने होत्याचे नव्हते केले आहे. शासनाने आता तरी आमची दखल घ्यावी," अशी आर्त हाक नुकसानग्रस्त शेतकरी देत आहेत.
कृषी विभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करावी, अशी मागणी नायगाव तालुक्यातून होत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी, जेणेकरून संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला काहीसा दिलासा मिळेल.