

वसमत : आलेगाव शिवारातील अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर व विहीरीतील पाणी उपसा केल्यानंतर तब्बल सहा तासानंतर शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सात मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आले. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
वसमत तालुक्यातील गुंज येथील मजूरदार महिलांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर आलेगाव शिवारातील विहीरीत पडला. यामध्ये सात जणींचा मृत्यू झाला असून दोन महिला व एक पुरुष मजूर यांना वाचविण्यात यश आले आहे. घटनास्थळी क्रेनच्या मदतीने विहीरीतील ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तीन विद्युतपंपाच्या सहाय्याने विहीरीतील पाणी उपसा करून सात महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झालेले मदत व बचाव कार्य दुपारी दोन वाजता संपले. घटनास्थळी गुंज, आलेगाव व परिसरातील गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला आवरताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काढण्यात आलेले मृतदेह पाहून मयतांच्या नातेवाईकांनी हंबरडाच फोडला. त्यामुळे घटनास्थळावरील वातावरण गंभीर बनले होते. नांदेड व हिंगोलीच्या प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून होते. दरम्यान, या विहीरीतून बाहेर काढण्यात आलेल्या सात मृतदेहापैकी चार मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोन मृतदेह नांदेड जिल्हयातील निळा येथील निळा प्राथमिक आरोग्य केंद्र व एक मृतदेह नांदेड जिल्हयातील लिंबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.
या घटनेची माहिती आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश नवघरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविली. त्यानंतर फडणवीस यांनी या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे जाहिर केले आहे. सदर घटना अत्यंत दुर्देवी असून मयतांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे.