

Nanded Tamsa road accident
तामसा : नांदेडहून तामसा गावाकडे येत असताना मोटारसायकल टोलनाक्यावर ठेवलेल्या सिमेंट बॅरिकेडला धडकल्याने सतीश सुरेशराव बारसे (वय 36, रा. बारसगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री घडली. या अपघातामुळे रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या निष्काळजी कारभारावर नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला असून प्रोजेक्ट मॅनेजर धोंडिबा जांभळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश बारसे आपल्या पत्नीसमवेत तामसा येथील जुने बसस्थानकाजवळ ‘आंध्रा इडली सेंटर’ आणि नाश्ता सेंटर चालवत होते. हॉटेलच्या कामासाठी ते नांदेडला गेले होते. काम आटोपून रात्री उशिरा मोटारसायकलने तामसा येथे परत येताना टोलनाक्याजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक, सूचना किंवा चेतावणी लावण्यात आलेली नसल्याने त्यांची मोटार सायकल सिमेंट बॅरिकेडला धडकली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, रुद्राणी कंपनीने रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे पाडले असून रात्री वाहनचालकांना ते दिसत नाहीत. कामाच्या ठिकाणी कोणतेही सावधानतेचे फलक नाहीत. मागील काही दिवसांतही एका चारचाकी वाहनाचा असा अपघात झाला होता; सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. या निष्काळजी कारभाराच्या निषेधार्थ नागरिक आणि नातेवाईकांनी तामसा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून कारवाईची मागणी केली.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नांदेड जिल्हा प्रमुख बबन बारसे यांनीही अपघातस्थळ व प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन मृतकांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यानंतर तामसा पोलीस ठाण्याचे पो.नि. सहदेव खेडकर यांनी फिर्यादी माणिक बारसे यांच्या तक्रारीवरून प्रोजेक्ट मॅनेजर धोंडिबा जांभळे आणि कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे तामसा परिसरात रुद्राणी कंपनीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.