

देगलूर : शहरातील मशिनीरी लाईन भागात सोमवारी (दि. १६) सकाळी एक भरधाव कार रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक देत थेट एका दुकानात घुसल्याची थरारक घटना घडली. या भीषण अपघातात दुकानासमोर बसून फवारणी पंपाचे दुरुस्तीकाम करणाऱ्या एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले.
दिगंबर निवृत्ती दबडे (वय ६८, रा. देगलूर) असे मृताचे नाव असून विठ्ठल येशमवार आणि दिलीप नीलमवार या दोघा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि.१६) सकाळीच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चारचाकी वाहन (क्रं. MH 06 AL 1898) हे उडुपी हॉटेलकडून स्टेट बँकेच्या दिशेने जात होते. यादरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हे वाहन अनियंत्रित झाले. चालकाने रस्त्यावरील अनेक छोट्या-मोठ्या वाहनांना धडक देत आपला मार्ग सोडला आणि शेवटी ते वाहन एका मशिनीरी दुकानात जाऊन धडकले.
या घटनेत दोन मोटरसायकलींचे तसेच दुकानातील शेतीपंपाच्या फवारणी पंपांचे आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरात एकच धावपळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे अधिक तपास करत असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.