Nanded News : अनधिकृत स्थलांतरामुळे 'शांतीनिकेतन' शाळेवर कारवाई

स्थलांतराचे नियम धाब्यावर बसवल्याचा ठपका
Nanded News
अनधिकृत स्थलांतरामुळे 'शांतीनिकेतन' शाळेवर कारवाई
Published on
Updated on

किनवट : तालुक्यातील कोठारी (चिखली) येथील शांतीनिकेतन पब्लिक स्कूल ही शाळा स्थलांतराची परवानगी न घेता गोकुंदा येथे सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित प्रकरणाची दखल घेत कारवाई सुरू केली आहे. पालकांनी या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

युवासेना विधानसभा प्रमुख दयाभाऊ पाटील यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या तक्रारीत, शाळा मूळ मान्यतेच्या ठिकाणी न चालवता गोकुंदा येथे सुरू असल्याचे नमूद केले आहे. तसेच या प्रकरणी संबंधित संस्थाचालकांवर नियमभंग केल्याबाबत दंडात्मक कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीची दखल घेत गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई केली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या सूचनेनुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर जाहीर सूचना लावून पालकांना सतर्क केले आहे. या सूचनेत शाळेला कोठारी (चिखली) इथेच शासनमान्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून गोकुंदा येथे सुरू असलेली शाळा अनधिकृत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित शाळेला तीन दिवसांच्या आत मूळ मान्यतेच्या ठिकाणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा शाळेचा यूडायस क्रमांक रद्द करण्यात येईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरोधात प्रशासन कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news