

Savli Markhel Bridge Collapse
मुखेड : मुखेड तालुक्यातील सावळी हे गाव तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले आहे. सावळीकरांचा दैनंदिन संपर्क मरखेलशी असल्याने हा मार्ग गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परंतु नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सावळी–मरखेल रस्त्यावरील दोन पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सावळी येथील नागरिकांचा व्यापारी, शैक्षणिक आणि सामाजिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर मरखेलशी निगडित आहे. विशेषतः येथील मुलामुलींना प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन तसेच अभियांत्रिकी, नर्सिंग, फार्मसीसारख्या उच्च शिक्षणासाठी रोज मरखेलला जावे लागते. मात्र, पुल वाहून गेल्याने थेट संपर्क तुटला असून विद्यार्थी जीव धोक्यात घालून ढासळलेल्या पुलातूनच मार्ग काढून शिक्षणासाठी ये-जा करत आहेत.
सावळी हे गाव तालुक्यापासून दूर असल्यामुळे विकासाच्या बाबतीत कायम दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे वाहून गेलेल्या दोन्ही पुलांचे तातडीने पुनर्बांधकाम करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय सुरळीत करावी, अशी ठाम मागणी सावळीकरांकडून करण्यात आली आहे.