Nanded Python Rescue : रिसनगाव येथे विहिरीत पडलेल्या अजगराला जीवदान

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. पुरी आणि सर्पमित्र नागेश शिकरे यांच्या प्रयत्नांना यश
Nanded Python Rescue : रिसनगाव येथे विहिरीत पडलेल्या अजगराला जीवदान
Published on: 
Updated on: 

लोहा : लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे विहिरीत पडलेल्या भारतीय अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. पुरी आणि सर्पमित्र नागेश शिकरे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अजगराला जीवदान मिळाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

रिसनगाव येथील पशुपालक बालाजी नागोराव हाबगुंडे यांच्या विहिरीत अजगर पडल्याचे निदर्शनास आले. अजगर दिसल्याने शेतकरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हाबगुंडे यांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. पुरी यांना याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच डॉ. पुरी आणि सर्पमित्र नागेश शिकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनीही कौशल्याने आणि सावधगिरीने अजगराला विहिरीतून सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यांच्या तत्परतेमुळे अजगराचे प्राण वाचले. या बचावकार्यात नूर अली, कैलास हाबगुंडे, अजय झाडे, संतोष वडजे आणि रिसनगाव येथील ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

वन्यजीव हे पर्यावरणाचा अविभाज्य भाग असून, त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विहिरीत किंवा अन्य ठिकाणी वन्यजीव अडकल्याचे आढळल्यास नागरिकांनी स्वतः त्यांना हाताळण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा बचाव पथकाची मदत घ्यावी, असे आवाहन डॉ. पुरी यांनी केले. या घटनेतून वन्यजीव संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news