

धोंडीबा बोरगावे
फुलवळ: काही दिवसांपूर्वीच फुलवळ महसूल मंडळात पावसाच्या हाहाकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वाधिक म्हणजेच १३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आता कुठे पावसाने उसंत घेतली असल्याची चिन्हे दिसताना बुधवारी रात्रीपासून पुन्हा फुलवळसह परिसरात अतिवृष्टीचा जोर वाढला आहे.
अचानक सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पण अतिपावसामुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहत असल्याने बहुतांश ठिकाणी गावागावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत देखील झाले आहे. मन्याड नदीही दुथडी भरून वाहत आहे. त्यातच सर्दी , ताप , खोकला अशा छोट्या मोठ्या आजारांनी डोके वर काढल्याने जनमाणूस चिंतातुर झाला आहे.
दरम्यान तत्काळ या भागातील खरिपाच्या पिकांचे शेत पंचनामे करून आवश्यक ती मदत करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान निसर्गाची देखील अतिवृष्टी सुरू असून, पावसाने खरिपातील पिके मातीमोल केली आहेत. या परिस्थितीत देखील प्रशासनाकडून ना पंचनामे ना सहानुभूतीचे बोल, अशा भावना नुकसानग्रस्त शेतकरी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
गेले काही दिवसांपासून चालू असलेल्या सतंतधार पावसामुळे छोट्या मोठ्या तलावांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ओढे , नाले , नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून फुलवळसह कंधार तालुक्यातील सर्वच भागात खरिपातील कापूस , सोयाबीन , ज्वारी , मूग , उडीद , तूर , तसेच हळद ही पिके आता हातची जातांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. मातीमोल झाला शेतशिवार तरीपण शासन व प्रशासन काही देईना आधार, अशा नागरिकांच्या भावना आहेत.
शेतशिवारांचे पंचनामे करून शासन व प्रशासन शेतकऱ्यांना आधार देईल अशी आशा होती परंतु आजपर्यंत तरी तसे काही दिसून येत नसल्याने शेतकरी चिंतेत अडकला आहे तर शेती पिकांबरोबरच दैनंदिन मानवी जनजीवन ही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळते आहे. तर अतिपावसामुळे फुलवळ जुने गावठाण व नवीन गावठाण च्या मधोमध असलेल्या पुलावरून अधूनमधून पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने नेहमीच संपर्क तुटत असतो तसेच कंधारेवाडी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने तिथल्या पण लोकांचा संपर्क तुटत आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत असून शालेय शैक्षणिक नुकसान होत आहे.